वाढदिवसानिमित्त श्वानाला मिळाला सोन्याचा गोफ !
By श्याम बागुल | Published: December 2, 2018 05:37 PM2018-12-02T17:37:30+5:302018-12-02T17:39:13+5:30
चेहेडीशिव भागातील रहिवासी व वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे श्वानप्रेमी रोहित राजपूत यांना बालपणापासून श्वानांची प्रचंड आवड व लळा असून, रोहित यांच्याकडे पहिले रॉकी नावाचे श्वान होते. रोहित याला सात वर्षांपूर्वी मित्रांनी वाढदिवसानिमित्त २ डिसेंबरला ‘ग्रेटडेन’ जातीचे आठ दिवसांचे श्वानाचे पिल्लू भेट दिले
नाशिक : आजच्या वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना तारेवरची कसरत करत संसाराचा गाडा हाकावा लागत आहे. मात्र दुसरीकडे चेहेडीशिव येथील श्वानप्रेमी रोहित राजपूत यांनी आपल्या पाळीव सात वर्षांच्या ‘भाऊ’ नामक श्वानाच्या वाढदिवसानिमित्त चक्क त्याला १३ तोळ्यांचा सोन्याचा गोफ भेट देऊन धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला.
चेहेडीशिव भागातील रहिवासी व वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे श्वानप्रेमी रोहित राजपूत यांना बालपणापासून श्वानांची प्रचंड आवड व लळा असून, रोहित यांच्याकडे पहिले रॉकी नावाचे श्वान होते. रोहित याला सात वर्षांपूर्वी मित्रांनी वाढदिवसानिमित्त २ डिसेंबरला ‘ग्रेटडेन’ जातीचे आठ दिवसांचे श्वानाचे पिल्लू भेट दिले. श्वानाशी खूप लळा असलेल्या रोहितने आठ दिवसांच्या त्या श्वानाच्या पिल्लाला मोठे केले. वाढदिवसानिमित्त मित्रांनी भेट दिलेल्या श्वानांचे त्याच दिवशी ‘रॉकी’ असे नामकरण केले. मात्र त्या श्वानाला सर्वजण ‘भाऊ’ म्हणू लागल्याने त्याचे नाव ‘भाऊ’ झाले. रोहितने आपल्या भाऊ श्वानांचा वाढदिवसदेखील स्वत:च्या वाढदिवसाच्या दिवशी साजरा करण्यास सुरुवात केली. भाऊचा प्रत्येक वाढदिवस रोहित त्याचे कुटुंबीय व मित्रपरिवार मोठ्या उत्साहाने साजरा करतात. यंदा रोहितने स्वत:च्या वाढदिवसाला स्वत:साठी काही न घेता लाडक्या भाऊ श्वानास सोन्याचा तेरा तोळ्यांचा गोफ बनवून त्याच्या गळ्यात अडकविला. भाऊ श्वानाच्या वाढदिवसानिमित्त रोहित मित्रांसह त्याला फिरविण्यासाठी रविवारी पनवेल जवळील कळंबोली येथे बहिणीच्या घरी घेऊन गेला. श्वानाचा वाढदिवस व त्यासाठी तेरा तोळे सोन्याचा गोफ तयार करणारा अवलिया विरळाच.
चौकट====
सारे काही श्वानासाठी...
लाडक्या भाऊ श्वानासाठी स्वतंत्र खोली, बेड असून फिरण्यासाठी चारचाकी गाडी आहे. सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत सर्व ठिकाणी भाऊ श्वान सोबत असते. मुके श्वान असले तरी तो एक प्रकारे माझा ‘भाऊच’ आहे.
- रोहित राजपूत, श्वानप्रेमी