‘ती’ दंगल ठरली गुंडांच्या टोळ्यांमधील भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:16 AM2021-02-11T04:16:16+5:302021-02-11T04:16:16+5:30

पोलीस आयुक्तालयातील अत्यंत संवेदनशील हद्द म्हणून भद्रकाली पोलीस ठाण्याची ओळख आहे. कारण गावठाण व संमिश्र स्वरूपाची दाट ...

‘She’ became a riot between gangs of thugs | ‘ती’ दंगल ठरली गुंडांच्या टोळ्यांमधील भडका

‘ती’ दंगल ठरली गुंडांच्या टोळ्यांमधील भडका

Next

पोलीस आयुक्तालयातील अत्यंत संवेदनशील हद्द म्हणून भद्रकाली पोलीस ठाण्याची ओळख आहे. कारण गावठाण व संमिश्र स्वरूपाची दाट लोकवस्ती असलेले जुने नाशिक हे या पोलीस ठाण्याचे मुख्य कार्यक्षेत्र आहे. या भागात कधी आणि कोठे कोणत्या प्रकारे कायदासुव्यवस्थेचा प्रश्न उद‌्भवेल याची शाश्वती देता येणे अवघड आहे. त्यामुळेच भद्रकाली पोलिसांपुढे कायदासुव्यवस्था टिकवून ठेवण्याचे नेहमीच मोठे आव्हान असते.

महालक्ष्मी चाळीत घडलेली दंगल गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमधील भडका होता. या दंगलीचा मुख्य सूत्रधार संशयित विशाल बेनवाल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीच तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

तसेच खुनाच्या गुन्ह्यातील फिर्यादी करण लोट व प्राणघातक हल्ल्याची फिर्याद देणारा पवन टाक हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुध्द उपनगर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्यात सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. सातत्याने या गुन्हेगारांच्या टोळ्यामध्ये चढाओढ व स्पर्धा लागलेली असते.

---इन्फो---

‘खबरी’चा संशय अन‌् काढला वचपा

दंगलीत मारला गेलेला आकाश हा पोलिसांचा ‘खबरी’ असल्याच्या संशयावरून टाक टोळीतील संशयित पवन टाक व अभय बेनवाल यांनी सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आकाश व करण लोट यांच्याशी वाद घातला. यानंतर करण व अर्जुन लोट आणि आका या तिघांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्याविरुध्द तक्रार दिली. यानंतर मध्यरात्री टाक व लोट या दोन टोळ्या समोरासमोर महालक्ष्मी चाळीत भिडल्या. यामध्ये आकाशला चॉपरसारख्या धारधार शस्त्राचा वर्मी घाव बसल्याने तो मृत्युमुखी पडला तर करण आणि पवन हे दोघेही हाणामारीत झालेल्या शस्त्रांच्या वापरामुळे जखमी झाले.

---इन्फो--

२४ गुंडांवर तडीपारीची कारवाई

भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत मागील एक ते दीड वर्षामध्ये शहरात सर्वाधिक २४ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. या पोलीस ठाण्यात झालेली ही कारवाई सर्वात मोठी आहे. इतक्या मोठ्या संख्येने अन्य कोणत्याही पोलीस ठाण्यात तडीपारी झालेली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले; मात्र तडीपारीची कारवाई होऊनही गुन्हेगार मोकाट फिरत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. यादीवरील सुमारे १५ ते २० संशयित गुन्हेगार पोलिसांच्या संभाव्य तडीपारीच्या रडारवर असून त्यांचीही चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी सांगितले.

Web Title: ‘She’ became a riot between gangs of thugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.