मोबाइलवर गाणे ऐकत ‘तिने’ संपविले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:19 AM2021-08-24T04:19:23+5:302021-08-24T04:19:23+5:30
इगतपुरी : तालुक्यातील तळेगाव येथील एका १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना रविवारी राखी पौर्णिमेच्या दिवशी घडली. स्वतःच्या ...
इगतपुरी : तालुक्यातील तळेगाव येथील एका १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना रविवारी राखी पौर्णिमेच्या दिवशी घडली. स्वतःच्या घरात गळफास लावून तिने जीवन संपविले. मोबाइलवर स्पीकर ओपन करून गाणे ऐकता ऐकता केलेल्या या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. इगतपुरी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तळेगाव, ता. इगतपुरी येथील मारुती भोईर हे पत्नीसह मोडाळे येथे रविवारी (दि.२२) सकाळी गेले होते. घरी त्यांची मुलगी योगिता (१८) ही एकटीच होती. सायंकाळी पावणेआठच्या सुमारास आई-वडिलांनी योगिताला जेवायला बोलावले. मात्र, तिचे उत्तर येत नसल्याने त्यांनी घरात जाऊन बघितले असता योगिताने गळफास लावल्याचे आढळून आले. याबाबत इगतपुरी पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी तातडीने धाव घेऊन कार्यवाही केली.
आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही. सायंकाळी ६ च्या सुमारास योगिताने मोबाइलवर गाणे लावून जीवन संपविले असल्याचे समजते. योगिताला २ मोठ्या बहिणी असून, ही लहान होती. एकच भाऊ असून, ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी ही घटना घडल्याने तळेगाव भागात हळहळ व्यक्त होत आहे.