लॉकडाऊनमध्ये ‘ती’ धावली अडीच हजार गर्भवतींच्या मदतीला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 07:42 PM2020-07-09T19:42:25+5:302020-07-10T00:22:10+5:30
नाशिक : लॉकडाऊन काळात प्रसूतीकळा सोसणाऱ्या आदिवासी गाव, पाड्यांवरील स्त्रियांच्या मदतीला राज्य सरकारची ‘१०८’ रुग्णवाहिका देवदूतासारखी धावून गेली. प्रसूतीची वेळ अत्यंत समीप आलेल्या जिल्ह्यातील आदिवासी भागातील ११ गर्भवती महिलांची प्रसूती डॉक्टरांनी यशस्वीरीत्या रुग्णवाहिकेतच केली. तसेच २ हजार ४११ गर्भवती स्त्रियांना जवळच्या शासकीय रुग्णालयात वेळीच दाखल केल्याने प्रसूतीच्या कळा सुस' झाल्या.
नाशिक : ( अझहर शेख )लॉकडाऊन काळात प्रसूतीकळा सोसणाऱ्या आदिवासी गाव, पाड्यांवरील स्त्रियांच्या मदतीला राज्य सरकारची ‘१०८’ रुग्णवाहिका देवदूतासारखी धावून गेली. प्रसूतीची वेळ अत्यंत समीप आलेल्या जिल्ह्यातील आदिवासी भागातील ११ गर्भवती महिलांची प्रसूती डॉक्टरांनी यशस्वीरीत्या रुग्णवाहिकेतच केली. तसेच २ हजार ४११ गर्भवती स्त्रियांना जवळच्या शासकीय रुग्णालयात वेळीच दाखल केल्याने प्रसूतीच्या कळा सुस' झाल्या. जननी-शिशू सुरक्षेसाठी प्रसूतीसमयी अत्यावश्यक व तातडीची वैद्यकीय सेवा मिळणेही तितकेच गरजेचे असते अन्यथा माता-बालक यांची सुरक्षा धोक्यात येते. त्यामुळे राज्य शासनाने आपत्कालीन वैद्यकीय मदतीअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘१०८’ रुग्णवाहिकेच्या चाकांना कोरोनाच्या संकटकाळात अधिकच गती आली. गावपातळीवरून कोरोना रुग्णांची ने-आण करण्यापासून अन्य अपघातांसह महिलांच्या प्रसूतीसाठी धावाधाव करत सेवा पुरवितांना जिल्ह्यातील एकूण ४६ रुग्णवाहिकांचे चालक (पायलट) व डॉक्टरांनी चोखपणे आपली भूमिका बजावली. ४६ पैकी १४ रु ग्णवाहिका कोरोना रुग्णांसाठी राखीव, तर उर्वरित ३२ रुग्णवाहिकांकडून अन्यप्रकारच्या सर्व घटकांना वैद्यकीय सेवा पुरविली जात आहे. आदिवासी भागांमध्ये प्रसूतीबाबत महिलांमध्ये किंवा त्यांच्या नातेवाइकांमध्ये फारशी जागृती नसल्यामुळे अत्यंत अखेरच्या टप्प्यात प्रसूतीसाठी तेथील महिलांची धावपळ होते.
कोरोनाचे संकट गडद होऊ लागल्याने मार्चच्या पंधरवड्यापासूनच राज्यात सर्वत्र लॉकडाऊन घोषित केले गेले. यामुळे अशाप्रसंगी तातडीची वैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी खासगी वाहनेसुद्धा जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांत उपलब्ध होत नव्हती. अशा कठीण प्रसंगात आदिवासी भागातील गर्भवती स्त्रियांच्या मदतीला ‘१०८’ची रुग्णवाहिका धावून गेली.
------------------------------
जिल्ह्यातील दिंडोरी, उमराळे, कळवण, त्र्यंबकेश्वर, हरसूल, पेठ या परिसरांतील आदिवासी गाव, पाडे, वस्तींवर गर्भवती महिलांची हेळसांड थांबवितांना ‘१०८’च्या रुग्णवाहिकाचालक व डॉक्टरांची मोठी कसरत होते.
---------------------
दुर्दशा झालेल्या रस्त्यांवरून खड्ड्यांतून वाट शोधत रुग्णवाहिका दारापर्यंत पोहोचविणे आणि रुग्णाला ‘रेस्क्यू’ करणे हे अत्यंत जिकिरीचे काम आदिवासी भागात लिलयापणे पार पाडले जात आहे.
-----------------------
जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये सेवा पुरवितांना अधिक आव्हानांचा सामना करावा लागतो. या भागात ११ गर्भवती महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेतच यशस्वीपणे पार पाडली. गर्भवती महिलांसह अन्य आपत्कालीन स्थितीत ‘१०८’ टोल-फ्री क्र मांकावरून सहजरीत्या मोफत रुग्णवाहिकेसह अन्य वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होते.
-डॉ. आश्विन राघमवार, जिल्हा व्यवस्थापक, नाशिक