गर्भवतीच्या मदतीला ‘ती’ धावली देवदूतासारखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 01:18 AM2018-12-20T01:18:48+5:302018-12-20T01:19:17+5:30
पांढुर्लीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत असतानाच वाटेतच महिलेला असह्य कळा सुरू झाल्या आणि रुग्णवाहिकेतील महिला डॉक्टर व परिचारिकेला सदर महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती करावी लागली.
लोकमत शुभवर्तमान
नाशिक : पांढुर्लीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत असतानाच वाटेतच महिलेला असह्य कळा सुरू झाल्या आणि रुग्णवाहिकेतील महिला डॉक्टर व परिचारिकेला सदर महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती करावी लागली. महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिला असून, माता व बालकांची प्रकृती स्थिर आहे. गर्भवती महिलेच्या मदतीला रुग्णवाहिका एकप्रकारे देवदूतासारखीच धावून आली. बुधवारी (दि.१९) सिन्नर-घोटी राज्य महामार्गावरील पांढुर्ली येथे मुक्ता तुकाराम म्हसाळ (३५) या नियमित तपासणीसाठी आल्या होत्या. यावेळी त्यांना त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांनी तपासणी करून रुग्णवाहिकेत एका परिचारिकेसह त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. यावेळी रुग्णवाहिकेवर नियुक्त डॉक्टर कांचन चव्हाण यांनी त्वरित सदर महिलेची रक्तदाबासह अन्य बाबी तपासल्या. रुग्णवाहिका चालक भीमराव जाधव यांनी भगूरमार्गे जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने रुग्णवाहिका मार्गस्थ केली. दरम्यान, विंचूरदळवी जवळ म्हसाळ यांना कळा सुरू झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने चव्हाण यांनी रुग्णवाहिका सुरक्षित ठिकाणी थांबविली. यावेळी परिचारिका व डॉक्टरांनी महिलेची यशस्वीरीत्या प्रसूती केली. सकाळी पावणेअकरा वाजता महिलेने मुलाला जन्म दिला.
देवळाली जवळ येताच मातेला पुन्हा त्रास सुरू झाल्याने रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला थांबविण्यात आली. दुसऱ्यांदा प्रसूतीची तयारी क रत वीस मिनिटाच्या अंतराने दुसरी प्रसूती झाली. महिलेने एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला. रुग्णवाहिकेतच म्हसाळ यांना पुत्र व कन्यारत्न प्राप्त झाले.
रुग्णवाहिकेत प्रसूत झालेली माता व तिचे दोन्ही बाळ सुदृढ असून, मुलाचे वजन १६७५ ग्रॅम तर मुलीचे वजन १५८० ग्रॅम इतके आहे. माता-बालक ांची प्रकृती स्थिर असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ग्रामीण भागात प्रसूतीच्या अंतिम टप्प्यात गर्भवती महिला प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात किंवा १०८ रुग्णवाहिकेची मदत घेतात. त्यामुळे अनेकदा रुग्णवाहिकेतच महिलांची प्रसूती होते.