खामखेडा शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 04:37 PM2018-10-15T16:37:13+5:302018-10-15T16:37:31+5:30
देवळा परिसर : शेतकरी वर्गात दहशत
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा शिनालमोक शिवारात बिबटयाच्या हल्ल्यात एका मेंढीचा बळी गेल्याची घटना घडली असून बिबट्याच्या संचारामुळे परिसरातील शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खामखेडा येथे धनगर समाजाचे लोकांचे वास्तव्य असून ते शेतीबरोबर जोड व्यवसाय म्हणून मेंढी पालन व्यवसाय करतात. दिवसभर मेंढ्या चारून रात्री शेतकऱ्यांच्या शेतात बसवितात . त्यामुळे शेतक-यांना शेतीसाठी खत मिळते. या खतांच्या मोबदल्यात या मेंढपाळाना पैसे किंवा धान्य दिले जाते. त्यावर सदर मेंढपाळ आपला उदरिनर्वाह करतात. खामखेडा येथील संतोष विठ्ठल बच्छाव यांचा मेंढपाळ व्यवसाय आहे. त्यांच्या मेंढ्यांचा खामखेडा येथील शेतकरी भिका नथु शेवाळे यांच्या शेतात रात्रीचा मुक्काम होता. रविवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास बिबटयाने या मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला . बिबट्याची चाहूल लागताच मेंढपाळांनी आरडाओरड केली असता आवाजाने बिबट्याने तिथून पलायन केले. बिबटयाच्या हल्यात एक मेंढी ठार झाली. सोमवारी सकाळी वनपाल आहेर यांना या घटनेची भ्रमणध्वनीवर माहिती देण्यात आली. वनपाल आहेर यांनी घटनस्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना या बिबटयाच्या पाऊलांचे ठसे आढळून आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महाले यांना यांनी पाचारण करण्यात येऊन पंचनामा करण्यात आला.