मिरची पिकात सोडल्या मेंढ्या
By admin | Published: June 2, 2017 12:35 AM2017-06-02T00:35:31+5:302017-06-02T00:36:51+5:30
ठेंगोडा : येथील दूध डेअरी सकाळपासूनच बंद होती. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी न पाठविण्याचा निर्णय घेतला
ठेंगोडा : येथील दूध डेअरी सकाळपासूनच बंद होती. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी न पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याने ते शेतकामासाठी शेतात न जाता गावातच थांबून संपावर लक्ष ठेवताना दिसत होते. किशोर परदेशी यांनी शेतकरी संपाला पाठिंबा देत आपल्या शेतातील एक एकर मिरचीच्या उभ्या पिकात मेंढ्या सोडल्या. एकरी नव्वद हजार रुपये खर्च करूनही मिरचीला भाव नाही. त्यातच आता काढणीला आलेली मिरची व बाजारात घेऊन जाण्यासाठी येणारा खर्च व विक्रीतून येणारा पैसा याची सांगड बसत नसल्याने ही मिरची न विकताच शेतकरी संपास पाठिंबा देत परदेशी यांनी मिरचीच्या उभ्या पिकात मेंढ्या चरण्यास सोडून दिल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर व्यवहारे, पप्पू शेवाळे, गोवर्धन शिंदे, तुळशिदास शिंदे, भारत धनवटे, किशोर परदेशी, हेमंत खैरनार, दशरथ महाले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.