शीतल सांगळे : स्वयंसेविकांच्या मानधन वाढीसाठी प्रयत्न सुरु सिन्नरला आदर्श ‘आशां’चा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:13 AM2017-12-13T00:13:04+5:302017-12-13T00:19:33+5:30
आरोग्य विभागाचे विविध उपक्रम व योजनांची ग्रामीण भागात सुयोग्य अंमलबाजावणीचे काम आशा स्वयंसेविका करतात. त्यांना शासनाकडून अतिशय कमी स्वरूपात मानधन दिले जात आहे.
सिन्नर : आरोग्य विभागाचे विविध उपक्रम व योजनांची ग्रामीण भागात सुयोग्य अंमलबाजावणीचे काम आशा स्वयंसेविका करतात. त्यांना शासनाकडून अतिशय कमी स्वरूपात मानधन दिले जात आहे. त्यामुळे ग्रामीण आरोग्याशी नाळ जोडलेल्या आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ व्हावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सांगितले.
येथील हॉटेल पंचवटीमध्ये ‘आशा दिवस’निमित्त आयोजित तालुकास्तरीय ‘आदर्श आशा’ गुणगौरव सभारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. आमदार राजाभाऊ वाजे, पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, पंचायत समितीचे गटनेते संग्राम कातकाडे, सदस्य जगन्नाथ भाबड, भगवान पथवे, संगीता पावसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव व्यासपीठावर उपस्थित होते. जीवनमान उंचावण्यासाठी आरोग्याला फार महत्त्व आहे. ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्थेचा आशा स्वयंसेविका महत्त्वाचा घटक आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी केवळ कागदावर योजना तयार करतात. या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आशा स्वयंसेविका यशस्वी पार पाडत असल्याचे गौरवोद्गार सांगळे यांनी काढले. तालुक्यात सध्या उपकेंद्रात प्रसूतीची टक्केवारी ९८ टक्क्यांच्या घरात आहे. ती शंभर टक्के होण्यासाठी आशा स्वयंसेविकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सोबतच ग्रामीण भागातील मुलींच्या जन्मदरात वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून आशा स्वयंसेविकांनी जनजागृती करावी, असे आवाहन सांगळे यांनी केले. आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त आहेत. या परिस्थितीत आशा स्वयंसेविका काम करतात. एकीकडे गरोदर महिला प्रसूती आणि दुसरीकडे लोकसंख्येला अटकाव अशी दोन विरुद्ध टोकांची जबाबदारी त्या यशस्वीपणे पेलतात. खºया अर्थाने आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा पाया आहे. याच पायावर आरोग्य विभागाचा डोलारा यशस्वी उभा आहे. मात्र, मूळ पायाकडेच शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची खंत आमदार राजाभााऊ वाजे यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील आदर्श आशा स्वयंसेविकांचा गौरव करण्यात आला.
या ‘आशां’ना आले गौरविण्यात
शैला सानप (दापूर), मंगल बैरागी, संगीता मालपाणी (देवपूर), सुरेखा जगताप (पांढुर्ली), माया गायधने (नायगाव), सुरेखा हिंगे (वावी), सरला आव्हाड (दापूर), संगीता साबळे (पांढुर्ली), गंगूबाई गोराणे (ठाणगाव), हेमलता कासार (वावी), चंद्रकला मंडले (ठाणगाव), नीता जाधव (नायगाव), शोभा डगळे (ठाणगाव), सरु बाई कातोरे (पांढुर्ली), योगीता भालेराव (दापूर), कुसुम जाधव (देवपूर), अर्चना काटे (वावी), वैशाली वाकचौरे (पांढुर्ली).