शेख यांनी पहिल्या फेरीतच घेतली आघाडी
By admin | Published: October 19, 2014 10:39 PM2014-10-19T22:39:09+5:302014-10-20T00:11:06+5:30
शेख यांनी पहिल्या फेरीतच घेतली आघाडी
मालेगाव : येथील मालेगाव मध्यमधून कॉँग्रेस उमेदवार माजी महापौर आसिफ शेख विजयी झाले. त्यांनी कॉँग्रसचे उमेदवार विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद ईस्माईल यांचा १६ हजार १५१ मतांनी पराभव केला.
मालेगाव मध्यमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी संदीप पाटील यांनी त्यांच्या विजयाची घोषणा करत त्यांना विजयाचे प्रमाणपत्र बहाल केले. मतमोजणीच्या केवळ १६ फेऱ्या असताना व जिल्ह्यात सर्वांत आधी येथील निकाल अपेक्षित असताना स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे मालेगाव मध्यचा निकाल सर्वांत उशिरा म्हणजे दुपारी जवळपास पाऊण वाजेच्या सुमारास घोषित करण्यात आला.
सकाळी ८ वाजता येथील छत्रपती श्री शिवाजी जिमखान्यात कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणीस प्रारंभ झाला. सर्वप्रथम पोस्टल मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर सव्वाआठच्या सुमारास इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची मतमोजणीस सुरुवात करण्यात आली. कॉँग्रेस उमेदवार आसिफ शेख यांनी पहिल्या फेरीतच आपले प्रतिस्पर्धी उमेदवार मौलाना मुफ्ती मोहंमद ईस्माईल यांच्यावर चार हजार ८८४ मतांची आघाडी घेतली. पाचव्या फेरीअखेर ही आघाडी १६ हजार २७६ मतांपर्यंत होती. सहाव्या ते आठव्या फेरीपर्यंत ही आघाडी ११ हजार १४५ मतांपर्यंत कमी झाल्यामुळे आमदार मौलांना समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या; परंतु त्यानंतर पुन्हा आसिफ शेख यांना दहाव्या फेरीअखेर १६ हजार ५५७ मतांची आघाडी मिळाली. उर्वरित फेऱ्यांपर्यंत ही आघाडी मोडणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर आमदार मौलाना यांच्या उरल्या सुरल्या समर्थकांनीही मतदान केंद्रातून काढता पाय घेतला.