‘कळसूबाई’ अभयारण्यात वाढतोय राज्यप्राणी शेकरू; राजूरच्या कोथळे ‘देवराई’त संवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 01:05 AM2020-09-09T01:05:17+5:302020-09-09T01:05:57+5:30
आदिवासींचे मोलाचे योगदान
- अझहर शेख
नाशिक : सह्याद्रीच्या कुशीत पश्चिम घाटात ‘भीमाशंकर’पाठोपाठ अकोले तालुक्यातील राजूर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कळसूबाई-हरिश्चंद्र गड अभयारण्यातसुद्धा राज्यप्राणी शेकरूवाढत आहे. वन्यजीव विभागाच्या वनरक्षकांना नियमित गस्तीदरम्यान सुमारे ७० शेकरू प्रत्यक्षरीत्या नजरेस पडले आहेत.
नाशिक वन्यजीव विभागातील अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्र गड अभयारण्यातील भंडारदरा व राजूर वनपरिक्षेत्राच्या हद्दीमध्ये स्थानिक आदिवासी बांधवांनी ‘देवराई’च्या माध्यमातून वृक्षसंवर्धन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने भंडारदराजवळील घाटघर, कोलटेंभे, रतनवाडी, कुमशेत, साम्रद भागांसह राजूर वनपरिक्षेत्रातील कोथळे देवराईत शेकरूंचा अधिवास वाढत आहे.
कोथळे देवराईमध्ये हिरडा, बेहडा, जांभूळ, आंबा, करंज, भेरलीमाड, सादडा, उंबर यासारख्या वृक्षप्रजाती चांगल्याच बहरल्या आहेत. या जंगलात शेकरू या मोठ्या खारूताईचा अधिवास सुरक्षित होत असल्याने संख्या वाढताना दिसत आहे.
दोन वर्षांपूर्वी दहा ते पंधरांच्या संख्येने असलेल्या शेकरूंमध्ये आता चांगली वाढ झाली आहे. वन्यजीव विभागाच्या वनरक्षकांना प्रत्यक्षपणे ७० शेकरू या भागातील वृक्षांच्या फांद्यांवर फिरताना आढळून आले असल्याचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांनी सांगितले.
कोरोनामुळे यंदा प्रगणनेला ‘ब्रेक’
कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता नाशिक वन्यजीव विभागाने दरवर्षीप्रमाणे एप्रिल-मे महिन्यात केली जाणारी शेकरूची शिरगणना यावर्षी खंडित केली. त्यामुळे शेकरूंच्या घरट्यांची मोजदाद केली गेली नाही; मात्र नियमित गस्तीदरम्यान वनरक्षक, वनमजुरांनी केलेल्या निरीक्षणातून शेकरूंचा अधिवास अधिकाधिक सुरक्षित होत असल्याचे दिसून आले.