शिमला मिरचीला मिळाला तीन रुपये किलोचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 10:42 PM2021-08-18T22:42:33+5:302021-08-18T22:43:29+5:30

जळगाव नेऊर : येथील शेतकऱ्याच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत असून, शिमला मिरची बाजारात विकायला घेऊन गेलेल्या शेतकऱ्याला ३ रुपये किला भाव मिळाल्याने त्यांना अन्य खर्च जाता अक्षरश: रिकाम्या हातानेच परतावे लागले.

Shimla chillies fetched Rs 3 per kg | शिमला मिरचीला मिळाला तीन रुपये किलोचा भाव

शिमला मिरचीला मिळाला तीन रुपये किलोचा भाव

Next
ठळक मुद्देजळगाव नेऊर : शेतमाल विकून रिकाम्या हातानेच परतले शेतकरी

जळगाव नेऊर : येथील शेतकऱ्याच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत असून, शिमला मिरची बाजारात विकायला घेऊन गेलेल्या शेतकऱ्याला ३ रुपये किला भाव मिळाल्याने त्यांना अन्य खर्च जाता अक्षरश: रिकाम्या हातानेच परतावे लागले.
शेतकरी कोणत्या पिकातून चार पैसे मिळतील या आशेने शेतात वेगवेगळी पिके घेण्याचा प्रयत्न करत असतो. दरवर्षी टोमॅटो, पोळ कांदा या पिकांना फाटा देऊन जळगाव नेऊर येथील राहुल ठोंबरे या शेतकऱ्याने २२ गुंठे क्षेत्रावर 'आशा' या वाणाची सिमला मिरचीची लागवड केली. लागवड केल्यापासून साधारणपणे आतापर्यंत रोपे, तार, बांबू , मल्चिंग पेपर, औषधे, खते असा साधारणपणे ७० ते ८० हजार रुपये खर्च केला. गेल्या पंधरा दिवसांपासून म्हणजे ५० व्या दिवसानंतर शिमला मिरची सुरू झाली. मागील हप्त्यात अकरा किलोच्या क्रेटला ११५ रुपयांचा भाव मिळाला, त्यात मजुरी व भाडे सुटले होते.

पण बुधवारी (दि.१८) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत १७५ क्रेट शिमला मिरची नेली असता एका क्रेटला अवघा ३५ रुपये भाव मिळाला. म्हणजे तीन रुपये किलो. त्याचे ६१२५ रुपये झाले, त्यात पाचशे पंचवीस रुपये हमाली जाता शेतकऱ्याच्या पदरात पाच हजार ५९९ रुपये पडले. त्यात गाडीभाडे ३००० व तोडण्यासाठी एका क्रेटला दहा रुपये असे ४,७५० रुपये खर्च आलेला असताना शेतकऱ्याला मात्र ८४९ रुपयांवर समाधान मानावे लागले.
कोरोना संकटानंतर शेतकऱ्यांपुढे भाजीपाला पिकांची मातीमोल भावाने विक्री हे मोठे संकट उभे राहिले आहे. त्या पैशातून शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसल्याने कर्ज कसे फेडावे व कोणती पिके घ्यावी, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.

भाजीपाला फेकून देण्याची वेळ
शेतकऱ्यांनी आपल्या जवळ असलेल्या थोड्याफार पाण्यावर शिमला मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, गिलके, काकडी, कोथिंबीर अशी पिके घेण्याचा प्रयत्न केला; परंतु या भाजीपाल्याचा खर्चदेखील वसूल होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकून दिलेला आहे.

यावर्षी साठवलेल्या पाण्यावर इतर पिकांकडे दुर्लक्ष करून शिमला मिरचीची लागवड केली. मोठ्या मेहनतीने मिरचीची निगा राखली. परंतु आता मिळत असलेल्या भावातून केलेला खर्चही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. उसनवारीने आणलेले पैसे कसे फेडावे, हा प्रश्न उभा आहे. - राहुल ठोंबरे, शेतकरी
(१८ मिरची, १८ पावती)

Web Title: Shimla chillies fetched Rs 3 per kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.