शिरवाडे वाकद : महिलांची पाण्यासाठी भटकंती; पाणीटंचाईने नागरिक त्रस्त पाणीपुरवठा योजना अपूर्णावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:01 AM2018-05-09T00:01:05+5:302018-05-09T00:01:05+5:30
देवगाव : निफाड तालुक्याच्या पूर्वेला येवला आणि कोपरगाव तालुक्याच्या सीमेलगत शिरवाडे वाकद गाव असून, या गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
देवगाव : निफाड तालुक्याच्या पूर्वेला येवला आणि कोपरगाव तालुक्याच्या सीमेलगत शिरवाडे वाकद गाव असून, या गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शासनाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विविध योजना अपूर्णावस्थेत असल्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. शिरवाडे वाकद येथे मंजूर ्रअसलेली भारत निर्माण पाणीपुरवठा योजना तब्बल नऊ वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. ती केव्हा पूर्ण होईल याची खात्री नाही. त्यातच एकमेव कूपनलिकेचा वीजपुरवठा थकीत वीजबिलाअभावी तोडण्यात आला आहे. गावठाणातील सर्वच हातपंपांना क्षारयुक्त पाणी आहे. त्यामुळे गोई नदीने वळसा घातलेल्या या गावाला वर्षभर पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना मूत्रविकाराचे आजार जडल्याचे चित्र आहे. शिरवाडे ग्रामपंचायतीच्या गावठाणात पाण्याचे जे स्रोत आहेत ते अत्यंत खराब असून, त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. सुमारे १३-१४ वर्षांपूर्वी गावात स्व-जलधारा योजनेतून दोन लाख ८५ हजार रुपयांचा निधी खर्च करून विहीर खोदण्यात आली. विहिरीला पाणीही मुबलक लागले; परंतु आजतागायत विहीर ते जलकुंभापर्यंत पाइपलाइन काही झाली नाही. त्यामुळे ही विहीर ‘असून अडचण, नसून खोळंबा’ ठरत असतानाच सन २००९ मध्ये भारत निर्माण योजनेंतर्गत तब्बल २२ लाख रुपयांची पाणी योजना अंमलात आली. ही योजना वर्षभरात पूर्ण न झाल्यास तब्बल २२ लाखांचा निधी परत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. संपूर्ण गावाची पिण्याच्या पाण्याची मदार येथील प्रभावतीनगर या आदिवासी वस्तीतील एकमेव हातपंपावर आहे. या हातपंपाला पाणी टिकून राहावे म्हणून गोदावरी कालव्याच्या आवर्तनातून बंधाºयात पाणी सोडावे लागते; मात्र यावेळेस आवर्तन मिळाले नाही. त्यामुळे या हातपंपावर जो प्रथम येईल त्यालाच पाणी मिळत असल्याने पहाटेपासूनच महिलांची गर्दी होत असते. त्यामुळे बहुतांश नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. स्मशानभूमीजवळ बोअरवेल घेतली असून, या बोअरवेलचे पाणी हनुमान मंदिराजवळच्या जलकुंभात टाकले जाते; मात्र तेही पाणी खराब असल्याने या पाण्याचा वापर केवळ घरगुती वापरासाठीच होतो. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके बसत असून, जनतेची तहान भागवण्यात प्रशासन असमर्थ ठरले आहे. येथील अपुºया पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करावे ही येथील जनतेची जुनी मागणी असतानाही त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने शिरवाडेकरांच्या नशिबी पाण्यासाठी भटकंती आणखी किती दिवस सुरू राहणार? हा एक प्रश्नच आहे.