सिन्नरहून चोरलेली बुलेट चोरट्यासह शिर्डीला सापडली
By Admin | Published: November 1, 2014 10:35 PM2014-11-01T22:35:53+5:302014-11-01T22:36:07+5:30
प्रसंगावधानामुळे दुचाकी चोर ताब्यात
सिन्नर : येथील देवीमंदिर रस्त्यावरील बंगल्यासमोर उभी असलेली नवी कोरी बुलेट चोरून नेणाऱ्या चोरट्याला गाडीमालकाच्या प्रसंगावधानामुळे अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. गुरुवारी रात्री सिन्नर येथून चोरीला गेलेली बुलेट शिर्डी येथे शुक्रवारी चोरट्यासह सापडली.
येथील भांड्यांचे प्रसिद्ध व्यापारी सोपान भगीरथ लोणारे यांचा देवीमंदिर रस्त्याच्या कडेला बंगला आहे. लोणारे यांच्याकडे दोन बुलेट असून, त्या बंगल्यासमोर उभ्या असतात. एकत्रित कुटुंबामुळे या दुचाकींच्या चाव्या बंगल्याच्या जिन्यात लावलेल्या असतात. याचा फायदा चोरट्याने घेतला. गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी सुनील भैरवनाथ साबळे (२६) याने लोणारे यांच्या बंगल्यासमोर उभी असलेली काळ्या रंगाची चार महिन्यांपूर्वीच खरेदी केलेली बुलेट (क्र. एमएच १५ इक्यू २२०) सुुरू करून पळवून नेली. बुलेट चोरीला गेल्याचे १५ ते २० मिनिटात लोणारे यांच्या निदर्शनास आले.
लोणारे यांनी शिर्डीचा मित्रपरिवार व पोलिसांच्या मदतीने बुलेटचा शोध सुरू केला. याचवेळी त्यांना संशयित आरोपी साबळे बुलेटसह मिळून आला. त्याने नंबर प्लेटवरील क्रमांक खोडून टाकला होता तसेच बुलेटचे आरसे विकून टाकल्याचे आढळून आले.
शिर्डी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर लोणारे यांना कळविण्यात आले. लोणारे यांनी सिन्नर पोलिसात बुलेट चोरीला गेल्याची फिर्याद नोंदविली होती. सिन्नर पोलिसांसह लोणारे शिर्डीला रवाना झाले. बुलेटच्या चेसी क्रमांकाहून बुलेटची ओळख पटली.
याप्रकरणी संशयित आरोपी सुनील भैरवनाथ साबळे मूळ राहणार शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा व हल्ली राहणारा राजवाडा,
सिन्नर याच्याविरोधात चोरीचा
गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय गायकवाड अधिक तपास करीत आहेत.(वार्ताहर)