शिरसाठ, अहिरे यांची पोलीस कोठडीत रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:58 AM2018-11-17T00:58:57+5:302018-11-17T00:59:10+5:30
पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि़ १५) मित्रमंडळ चौकातील एका हॉटेलात सापळा रचून नाशिक ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह हवालदारास दोन लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे.
नाशिक : पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि़ १५) मित्रमंडळ चौकातील एका हॉटेलात सापळा रचून नाशिक ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह हवालदारास दोन लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक राजेश सदाशिव शिरसाठ (वय ४८, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण) आणि पोलीस हवालदार संजीव खंडेराव अहेर (वय ४८) अशी त्यांची नावे असून, फसवणुकीच्या गुन्ह्यात वॉरंट न बजावण्यासाठी तसेच खटल्यात मदत करण्यासाठी ही रक्कम घेण्यात आली होती़ या दोघांनाही पुणे येथील न्यायालयात हजर केले असता १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
तक्रारदाराकडून दोन लाख रुपये घेताना पोलीस हवालदार संजीव
अहेर यांना रंगेहाथ पकडण्यात
आले. यावेळी पोलीस निरीक्षक शिरसाट हे दुसरीकडे थांबले होते. त्यांनी आहेर यांना पैसे घेण्यासाठी पाठविले होते. त्यांचे त्याबाबत तक्रारदाराशी झालेले संभाषण रेकॉर्ड करण्यात आले होते. या संभाषणानुसार लाच घेण्यामध्ये त्यांचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यामुळे रात्री उशिरा दोघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रतिभा शेंडगे व उपअधीक्षक दत्तात्रय भापकर यांनी ही कारवाई केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक प्रतिभा शेंडगे करीत आहेत.