"शिवसैनिक माझी वडिलोपार्जित संपत्ती; वालीचा वध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 01:16 PM2024-01-23T13:16:24+5:302024-01-23T13:23:34+5:30
जय भवानी जय शिवाजी तसेच उद्धव ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचं अधिवेशनाच्या व्यासपीठावर स्वागत केले
नाशिक - शिवसेनाप्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताचे औचित्य साधून शिवसेनेनं आगामी निवडणुकांचं रणशिंगच फुंकलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या आधिवेधनाला नाशिक शहरातील हॉटेल डेमोक्रॉसी येथे आज सुरुवात झाली. शिवसेना पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनातील भाषणातून पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. तर, राज्यातील महायुती सरकारला आणि केंद्रातील मोदी सरकारवरही जोरदार टीका केली.
जय भवानी जय शिवाजी तसेच उद्धव ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचं अधिवेशनाच्या व्यासपीठावर स्वागत केले. यावेळी, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे, स्व बाळासाहेब ठाकरे तसेच माँ साहेब मीनाताई ठाकरे आणि भारत मातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर, येथील मेळाव्यात शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंनी राम मंदिर सोहळ्याचं राजकारण आणि केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणावरुन टीका केली. तर, राज्यातील महायुती सरकारवरही निशाणा साधला. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तुलना रामायणातील वालीशी केली.
राम की बात झाली आता काम की बात करो. दहा वर्षांत तुम्ही काय केलं. राम एक वचनी होते, तुम्ही कुठे एक वचनी आहात, शिवसेनेला दिलेले वचन पाळाले नाही, असे म्हणत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांवर हल्लाबोल केला. तसेच आमच्या शिवसैनिकामुळे तुम्हाला सत्ता मिळाली, दिल्ली बघायला मिळाली, पुचाट भाजपामुळे नव्हे. आमच्यामुळे सत्ता मिळाली त्या शिवसेनेचे नेते तुम्हाला भ्रष्ट वाटतात. पी.एम. केअर घोटाळा झालाय, पाहिले त्या घोटाळ्याची चौकशी करा, त्याचा हिशेब का देत नाहीत, असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला. तसेच, आम्ही देखील तुमच्या घोटाळ्यांबाबत तक्रारी केल्या, पण त्याची चौकशी नाही झाली. आम्ही मात्र चौकशी करून तुम्हाला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही अधिवेशनातून दिला.
शिवसैनिक माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. ही संपत्ती मला वारस्याने मिळाली आहे, चोरून मिळालेली नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. तसेच, रामायणात प्रश्रू श्रीरामांनी वालीचा वध का केला, आम्हीही वालीचा वध केल्याशिवाय राहणार नाही, कारण या वालीने आमची शिवसेना पळवली आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंना वालीची उपमा दिली. यापूर्वीही, एकनाथ शिंदेंना मिंधे म्हणत आणि आमचा बाप चोरला असे म्हणत शिवसेना पक्षातील कायदेशीर लढाईनंतर उद्धव ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला होता.
शिवसेना राज्यव्यापी अधिवेशन २०२४ । नाशिक - #LIVEhttps://t.co/3tFaQmDKN0
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 23, 2024
प्रभू रामचंद्र प्रमाणे उद्धव ठाकरे संयमी - संजय राऊत
प्रभू रामचंद्र यांचे शिवसेनेशी नाते आहे. शिवसैनिक अयोध्येत गेले नसते तर श्री रामाची प्रतिष्ठापणा झाली नसती. काल पंतप्रधान हे त्यामुळेच श्री रामाची प्रतिष्ठापणा करू शकले. नाशिक ही कुरुक्षेत्राची भूमी येथून रामाने संघर्ष सुरू केला. प्रभू रामचंद्र प्रमाणे उद्धव ठाकरे संयमी असल्याचे मत यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केले. तसेच, मी कल्याणला नुकतेच गेलो तेथे उद्धव ठाकरे यांचे असे स्वागत झाले, जणू श्री अयोध्येत प्रभू रामाचे झाले होते. रामाच्या हातात धनुष्यबाण आहे, आता मला वाटतं रामाच्या हाती मशाल येईल, असे संजय राऊत म्हणाले.