शिवसेना-भाजप ठरवेल मालेगावचा महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 01:14 AM2019-12-07T01:14:06+5:302019-12-07T01:14:47+5:30
मालेगाव महापालिकेच्या महापौरपदासाठी काँग्रेस व महागठबंधन आघाडीच्या गोटातील घडामोडींना वेग आला आहे. शहराच्या पश्चिम भागातील भाजप व शिवसेनेच्या भूमिकेवरच महापौराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
मालेगाव : महापालिकेच्या महापौरपदासाठी काँग्रेस व महागठबंधन आघाडीच्या गोटातील घडामोडींना वेग आला आहे. शहराच्या पश्चिम भागातील भाजप व शिवसेनेच्या भूमिकेवरच महापौराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
मालेगाव महापालिकेत शिवसेना व काँग्रेसची सत्ता आहे. गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेसचे महापौर रशीद शेख व शिवसेनेचे उपमहापौर सखाराम घोडके यांनी कामकाज पाहिले. १५ डिसेंबर रोजी त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. तत्पूर्वी १२ डिसेंबरला महापौरपदाची निवड केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नामांकन अर्ज विक्रीला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या ताहेरा शेख व महागठबंधन आघाडीच्या जैबुन्नीसा समसुद्दोहा यांनी नामांकन अर्ज घेतला आहे. महापौरपद ओबीसी महिला आरक्षित झाल्याने पुढील अडीच वर्षांसाठी महिला नगरसेवकाला महापौरपदाची संधी मिळणार आहे. काँग्रेसतर्फे माजी महापौर ताहेरा शेख यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे, तर महागठबंधन आघाडीतर्फे जनता दलाच्या शान-ए-हिंद निहाल अहमद यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. शहराच्या पश्चिम भागात काँग्रेस व महागठबंधन आघाडीचे विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. दोघा पक्षांमध्ये राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व भागातील शिवसेनेचे १३ व भाजपचे ९ नगरसेवक किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. महागठबंधन आघाडी व काँग्रेसनेही शिवसेनेला उपमहापौरपद देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र शिवसेना गेली अडीच वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेससोबत जाते की महागठबंधन आघाडीसोबत, याबाबत उत्सुकता आहे. शुक्रवारी रात्री शिवसेनेचे आमदार दादा भुसे मालेगावी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर महागठबंधन आघाडी व काँग्रेसही त्यांच्याशी संपर्क साधण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर महापौर कोणत्या पक्षाचा होईल, यावर शिक्कामोर्तब होणार आहे. शहराच्या पश्चिम भागातील नगरसेवकच मनपाचा महापौर ठरविण्याची शक्यता आहे. राज्याच्या राजकारणातील उलथापालथीचा अनुभव सगळ्यांनीच घेतला आहे. शहराच्या पूर्व भागातील कट्टरविरोधक असलेल्या काँगे्रस व महागठबंधन आघाडीसुद्धा वाटाघाटी करून महापौर व उपमहापौर ठरविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप व शिवसेनेला सत्तेपासून रोखण्याच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत.