शिवसेना-भाजपा स्वबळावर लढणार
By admin | Published: August 6, 2016 01:15 AM2016-08-06T01:15:40+5:302016-08-06T01:15:52+5:30
प्रभाग ३५-३६ पोटनिवडणूक : इच्छुकांच्या बैठका सुरू
नाशिकरोड : जेलरोड प्रभाग ३५ व ३६ च्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना, भाजपाने इच्छुकांच्या बैठका घेऊन स्वबळाच्या जोरावर निवडणुकीची तयारी चालविली आहे. मनसेची बैठक घेऊन निवडणूक लढण्याचे निश्चित केले आहे. तर गेल्या निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी असलेले दोन्ही पक्ष अद्याप ‘कोमात’ असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रभाग ३५ ब मधून शोभना शिंदे व प्रभाग ३६ ब मधून नीलेश शेलार हे मनसेकडून निवडून आल्यानंतर गेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षाचा व्हीप झुगारला म्हणून त्या दोघांचे नगरसेवक पद रद्दबातल ठरविले गेले होते.
प्रभाग ३५, ३६ ब च्या पोटनिवडणुकीकरिता येत्या २८ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांना सर्वच पक्ष, पदाधिकारी, इच्छुकांचा विरोध होता. पक्षाची व पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्यामुळे प्रारंभी फारसा रस राजकीय पक्ष, पदाधिकारी, इच्छुक दाखवत नव्हते. मात्र आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय पक्षासह इच्छुकांनी हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. तीन दिवसांपासून उमेदवारी अर्ज विक्री व भरून देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून प्रभाग ३५ मध्ये १३ व प्रभाग ३६ मध्ये १७ असे एकूण ३० उमेदवारी अर्ज विक्री झाले आहेत; मात्र अद्याप एकानेही उमेदवारी अर्ज भरला नाही. कॉँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष अद्याप झोपेतून जागा झालेला नसल्याची स्थिती आहे. गेल्या निवडणुकीत दोघांनी आघाडी करून निवडणूक लढविली होती; मात्र पोटनिवडणुकीत आघाडी होणार की नाही किंवा स्वतंत्र निवडणूक लढवायची याबाबत अद्यापही बैठक न झाल्याने दोन्ही पक्ष अद्याप कोमात असल्याचे चित्र दिसत आहे. (प्रतिनिधी)