शिवसेनेकडून व्यंकय्या नायडू यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 05:59 PM2020-07-23T17:59:45+5:302020-07-23T18:05:26+5:30
वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी (दि.२२) राज्यसभेत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. त्यामुळे राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना अवमान करणाऱ्या कडक शब्दात सूचना केल्याचा आरोप करीत शिवसेनेने शालिमार येथील पक्ष कार्यालयासमोर व्यंकय्या नायडू यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून भाजपाविरोधात घोषणाबाजी केली.
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी (दि.२२) राज्यसभेत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. त्यामुळे सभागृहाचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना अवमान करणाऱ्या कडक शब्दात सूचना केल्याचा आरोप करीत शिवसेनेने शालिमार येथील पक्ष कार्यालयासमोर व्यंकय्या नायडू यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून भाजपाविरोधात घोषणाबाजी केली.
खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेत दिलेल्या घोषणेवरून एकेकाळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मित्रपक्ष म्हणून सत्ता उपभोगणारे भारतीय जनता पार्टी व शिवसेना पक्ष एकमेकांविरोधात उभे राहिले आहे. शिवसनेने भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणेला विरोध करणे ‘हेच का तुमचे हिंदुत्व’ असा सवाल केला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते असलेले व्यंकय्या नायडू यांच्या भूमिकेतून भाजपचीच भूमिका स्पष्ट होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणेला विरोध करण्याची भूमिका ही व्यंकाय्या नायडू यांच्यासोबत भाजपचीही असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्तेवर आलेल्या भाजपला या देशातील जनताच धडा शिकवेल, असा इशाराही शिवसेनेतर्फे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, महानगरप्रमुख महेश बिडवे, मनपा विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, नगरसेवक सुनील गोडसे, डी. जी. सूर्यवंशी, योगेश बेलदार, योगेश देशमुख, नाना काळे, पप्पू टिळे, गोरख वाघ, प्रमोद नाथेकर, अनिल बागुल, शशिकांत कोठुळे, देवा जाधव, संजय चिंचोरे, राजेंद्र नानकर, सचिन बांडे, हेमंत उन्हाळे, राजेंद्र वाकसरेआदी उपस्थित होते.