सिडको प्रभागावर शिवसेनेचे वर्चस्व कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:12 AM2021-07-20T04:12:13+5:302021-07-20T04:12:13+5:30
सिडको : सिडको प्रभाग समितीच्या निवडणुकीत भाजपच्या महिला नगरसेवक छाया देवांग यांनी माघार घेतल्याने अनेक वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ...
सिडको : सिडको प्रभाग समितीच्या निवडणुकीत भाजपच्या महिला नगरसेवक छाया देवांग यांनी माघार घेतल्याने अनेक वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडको प्रभाग सभेवर यंदाच्या वर्षी देखील शिवसेनेच्या महिला नगरसेवक सुवर्णा मटाले यांची बिनविरोध निवड झाली.
सिडको प्रभाग सभापतींची निवडणूक सोमवारी ( दि १९ ) रोजी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली .यासाठी गेल्या बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते .यामध्ये सिडको प्रभागातून शिवसेनेकडून सुवर्णा मटाले व भाजपाकडून छाया देवांग यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सिडको प्रभागात गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे प्राबल्य असून यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत देखील शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहे. या पाठोपाठ भाजपाने बाजी मारली असली तरी पक्षीय बलाबल बघता शिवसेना व भाजपा यांच्यात मोठ्या प्रमाणात तफावत आहे.
सिडको प्रभाग सभापती पदाच्या निवडणुकीसाठी सिडकोतून शिवसेनेकडून महिला नगरसेवक सुवर्णा मटाले ,कल्पना चुंबळे, प्रवीण तिदमे,शामकुमार साबळे,संगीता जाधव, किरण गामणे यांनी तयारी दर्शविली होती. परंतु शिवसेनेकडून सुवर्णा मटाले यांचेच नाव निश्चित करण्यात आले होते, यामुळे शिवसेनेकडून मटाले यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. सिडको प्रभागात एकूण सहा प्रभाग येतात. यामध्ये प्रभाग क्रमांक २४ , २५ ,२७,२८ , २९ व ३१ या प्रभागांचा समावेश करण्यात आला आहे. या सहा प्रभागातील चोवीस नगरसेवकांमध्ये शिवसेनेचे सुधाकर बडगुजर, विद्यमान सभापती चंद्रकांत खाडे,डी.जी. सूर्यवंशी, प्रवीण तिदमे,श्यामकुमार साबळे, दीपक दातीर, सुदाम डेमसे ,रत्नमाला राणे,सुवर्णा मटाले, हर्षा बडगुजर ,संगीता जाधव, कल्पना चुंभळे, किरण दराडे असे एकूण १३ नगरसेवक आहे. या पाठोपाठ भारतीय जनता पार्टीचे मुकेश शहाणे ,निलेश ठाकरे ,राकेश दोंदे, भगवान दोंदे, प्रतिभा पवार, छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे ,कावेरी घुगे, आव्हाड तर राष्ट्रवादी पक्षाचे राजेंद्र महाले एक नगरसेवक आहेत.
चौकट..
पक्षीय बलाबल
सिडको प्रभागात २४ नगरसेवकांपैकी शिवसेनेचे १४ नगरसेवक होते परंतु शिवसेनेच्या ज्येष्ठ महिला नगरसेवक कल्पना पांडे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने शिवसेनेचे सध्या १३ नगरसेवक आहेत. या पाठोपाठ भाजपाचे ९ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र महाले हे एकमेव नगरसेवक आहेत.
चौकट.
भाजपची खेळी
सिडको प्रभागात शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक असल्याचे माहीत असतानाही भाजपाने शिवसेनेचा सभापती हा बिनविरोध होऊ नये ,यासाठी छाया देवांग यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. परंतु असे असले तरी सुवर्णा मटाले यांनाच सभापतिपदाचा मान मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.