शिवसेना सध्या मागणाऱ्याच्या भूमिकेत
By admin | Published: May 18, 2017 12:37 AM2017-05-18T00:37:42+5:302017-05-18T00:38:31+5:30
सुभाष देसाई : शेतकरी लढ्याची शुक्रवारी घोषणा
नाशिक : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे शेतकरी कर्जमुक्त व्हावा हीच शिवसेनेची मागणी असून, सत्तेत असलो तरी शिवसेना सध्या मागणाऱ्याच्या भूमिकेत असल्याने शेतकऱ्यांना देणाऱ्याच्या भूमिकेत फक्त मुख्यमंत्री व वित्तमंत्री असल्याची टीका शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी कर्जमुक्तीच्या लढ्याची घोषणा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
शुक्रवारी नाशिक येथे शेतकरी कृषी अधिवेशन होत असून, त्यापार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सुभाष देसाई व खासदार संजय राऊत यांचे येथे आगमन झाले. या अधिवेशनाची त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, शिवसेना सध्या राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेत असून, मराठवाडा, विदर्भ, अकोला यांसारख्या भागांमध्ये केलेल्या पाहणीत व घेतलेल्या भेटीत शेतकऱ्यांच्या अनेक समस्या समोर आल्या आहेत. दोन ते तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत, तर शासनाच्या योजनादेखील त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नसल्याचे आढळून आले आहे. तूर खरेदीबाबतही शासन अपयशी ठरले असून, शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्या तुरीला अधिक महत्त्व दिले जात आहे. शेतकऱ्यांवर होत असलेल्या चौहोबाजूंनी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेने दक्षता पथक नेमण्याचा निर्णय घेतला असून, जेथे शेतकऱ्यांवर अन्याय होईल तेथे सरकारला जाब विचारण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. ‘मी कर्जमुक्त होणारच, गर्जतो शेतकरी’ असा नारा घेऊन शिवसेना रस्त्यावर उतरली असून, शुक्रवारच्या अधिवेशनात या लढ्याची मोठी घोषणा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
शिवसेना सत्तेत असूनही सरकारविरुद्ध आंदोलनाच्या भूमिकेत असल्याचे देसाई व खासदार राऊत यांनी समर्थन केले. सत्तेत असलो तरी आमच्याकडे शेतकऱ्यांना देण्यासारखे काहीच नाही म्हणून ते मिळविण्यासाठीच शिवसेना लढ्यात उतरल्याचे सांगून शेतकरी कर्जमुक्ती झाली नाही तर पावसाळी अधिवेशनावर शेतकऱ्यांचा भव्य लॉँगमार्च काढण्यात येईल व ‘आर-पार’ची लढाई लढण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, यास सरकार व रिझर्व्ह बॅँक जबाबदार असल्याची टीका केली, तसेच समृद्धी महामार्ग हे मुख्यमंत्र्यांचा स्वप्नवत प्रकल्प असून, त्यासाठी शेतकरी उद्ध्वस्त झाला तरी चालेल अशी त्यांची भूमिका आहे पण शिवसेना ते होऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून संप फोडण्याचे राजकारण
राज्यातील शेतकऱ्यांनी एक जूनपासून संपावर जाण्याची घोषणा केली आहे, ते पाहता मुख्यमंत्र्यांनी धुळे येथे जाण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष द्यायला हवे होते, असा टोला लावून देसाई यांनी, देशात पहिल्यांदाच शेतकरी संपावर जाण्याची घटना घडत असताना मुख्यमंत्री संप फोडण्याचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला. कृषी अधिवेशनात संपावर जाणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधीदेखील सहभागी होणार असल्याची माहितीही देसाई यांनी दिली.