बस सेवेसह सर्वच प्रश्नांवर शिवसेना दुटप्पी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:45 AM2021-01-08T04:45:27+5:302021-01-08T04:45:27+5:30
शिवसेनेच्या वतीने सध्या महापालिकेचे एकेक मुद्यावर निवेदने देणे आणि अन्य स्वरूपाचे आक्षेप घेणे सुरू आहे. त्यावर भाजपाचे गटनेते जगदीश ...
शिवसेनेच्या वतीने सध्या महापालिकेचे एकेक मुद्यावर निवेदने देणे आणि अन्य स्वरूपाचे आक्षेप घेणे सुरू आहे. त्यावर भाजपाचे गटनेते जगदीश पाटील यांनी आता प्रत्युत्तर देऊन शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. शहर बस वाहतुकीसाठी मार्च महिन्यात शहराजवळ बस दाखल झाल्या. मग आताच या बस बीएस फोर या निकषाच्या असल्याचा साक्षात्कार कसा काय झाला? राज्यात सेनेची सत्ता असून परिवहन आणि ऊर्जा मंत्रिपद शिवसेनेकडेच आहे. मग त्यांच्याकडेच या विषयावर तक्रार का करीत नाही, असा प्रश्न पाटील यांनी केला आहे. शहरातील खुल्या जागांवर १५ टक्के बांधकाम करण्यास मनाई करणारा आदेश नगरविकास मंत्र्यांनी दिला असून, तो उठवण्याऐवजी स्थानिक पातळीवर आयुक्तांना निवेदन देऊन शिवसेना काय साधत आहेत, असा प्रश्न पाटील यांनी केला आहे. मनपा कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा प्रश्नदेखील शासनाकडून सोडवून आणला जात नाही, स्थायी समिती निवडणूक, टीडीआर घोटाळा अशा प्रकरणात थेट शासनाकडून स्थगिती आदेश आणणारे शिवसेनेचे पदाधिकारी फक्त स्थानिक स्तरावर चमकोगिरी का करीत आहेत, असा प्रश्न पाटील यांनी केला आहे.