निफाड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; रूपाली रंधवे यांची नगराध्यक्षपदी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 01:49 PM2022-02-15T13:49:18+5:302022-02-15T13:50:14+5:30
निफाड शहर विकास आघाडी, शिवसेना, काँग्रेस,बसपा, अपक्ष यांच्या एकत्रित आघाडीकडेच १० महिला नगरसेवक आहेत.
निफाड - नाशिकमधील निफाड येथील नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी निफाड शहर विकास आघाडी, शिवसेना, काँग्रेस, बसपा,अपक्ष या एकत्रित आघाडीकडे भरभक्कम १७ पैकी १४ नगरसेवकांचे बहुमत असल्याने या आघाडीच्या वतीने शिवसेनेच्या रुपाली रंधवे यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. नगराध्यक्ष या आघाडीचाच होणार हे आधीपासूनच स्पष्ट झालेले होते.
आघाडीच्या वतीने शिवसेनेच्या रुपाली रंधवे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल होते. निफाड नगरपंचायत निवडणुकीत माजी आमदार अनिल कदम, राजाभाऊ शेलार, अनिल कुंदे, यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी निफाड शहर विकास आघाडी शिवसेना, काँग्रेस, बसपा, अपक्ष यांच्या एकत्रित आघाडीला १७ पैकी १४ जागा मिळाल्या होत्या तर आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त ३ जागा मिळाल्या होत्या.
निफाड शहर विकास आघाडी, शिवसेना, काँग्रेस,बसपा, अपक्ष यांच्या एकत्रित आघाडीकडेच १० महिला नगरसेवक आहेत. यात सत्तेचा समतोल राखण्यासाठी चिठ्ठी पद्धतीचा फॉर्म्युला वापरण्यात आला. यानुसार १० महिला नगरसेवकांपैकी ५ महिला नगरसेवकांच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यात रुपाली रंधवे यांच्यासह कांताबाई कर्डीले, रत्नमाला कापसे, शारदा कापसे, कविता धारराव यांचा समावेश हाेता.
यात नगरसेवकांच्या चिठ्ठ्या अनुक्रमाने निघाल्या. त्यामुळे सर्वात आधी रुपाली रंधवे यांना नगराध्यक्ष होण्याची संधी देण्यात आली. चिठ्ठीत निघालेल्या उर्वरित ४ महिला नगरसेवकांना त्याच अनुक्रमाने नगराध्यक्षपदासाठी संधी देण्यात येणार आहे. या सर्वांना पहिल्या अडीच वर्षांतच रोटेशननुसार नगराध्यक्षपद मिळणार आहे.