भाजपाकडून नारायण राणेंच्या खांद्याचा वापर; शिवसैनिकांचे खांदे भक्कम, संजय राऊतांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 11:11 AM2021-08-29T11:11:07+5:302021-08-29T11:12:14+5:30
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे.
नाशिक : भारतीय जनता पक्षाने नारायण राणे यांच्या खांद्याचा उपयोग करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरू केली. त्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागले. वेळ पडली तर यापुढेही तेच होईल. परंतु भाजपने ज्या पद्धतीने राणे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारल्या ते पाहता, आमच्याकडेही शिवसैनिकांचे खांदे भरपूर आहेत. त्याचा उपयोग करू देण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनी दिला.
राऊत यांनी शनिवारी नाशिकच्या शिवसैनिकांशी संवाद साधला. शिवसेनेतून अनेक गेले अनेक आले; परंतु राणे यांच्यासारखा उत-मात कोणी केला नाही. शिवसेेनेसमोर ज्यांचे वेडेवाकडे पाऊल पडले ते संपले, असे सांगून, शिवसैनिकांना नाशिकमध्ये दगड का हातात घ्यावे लागले याचे आत्मपरीक्षणही संबंधितांनी करावे, असा सल्ला त्यांनी दिला.
राज्यातील अन्य तीन केंद्रीय मंत्री जन आशीर्वाद यात्रेनिमित्त केंद्र सरकारच्या योजना व त्याचा प्रचार, प्रसार करण्याचे काम करीत आहेत. मात्र एक अतिशहाणा मंत्री मोदी यांचे व सरकारचे आदेश न पाळता शिवसेना, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर टीका करीत सुटला आहे. त्यामुळे व्हायचे तेच झाले. ते घसरल्यावर लगाम घालावाच लागला, असे सांगून राणे यांच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा व त्यांना झालेली अटक याचे राऊत यांनी समर्थन केले.
राणे यांच्यासाठी शिवसेना रोज प्रार्थना करणार-
केंद्रीय मंत्री राणे यांच्यावर टीका करताना राऊत यांनी त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. त्यांना मानसिक आधाराची गरज आहे. त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी शिवसेना रोज सकाळी एक मिनिट प्रार्थना करणार आहे. भाजपनेही अशी प्रार्थना करावी तसेच नारायण राणे यांनीही योगा-विपश्यनेसारखे पर्याय शोधावेत, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला. राऊत यांच्या दौऱ्यात भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांनी त्यांची भेट घेतल्याने आता ते सेनेच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘त्या’ शिवसैनिकांचे कौतुक-
राऊत यांनी भाषणात नाशिकच्या शिवसैनिकांचे कौतुक केले. नाशिकमध्ये नारायण राणे यांच्याविरुद्ध पहिला गुन्हा दाखल झाला. भविष्यात नाशिक हे महाराष्ट्राला मार्गदर्शक व दिशादर्शक म्हणून राहील, असे ते म्हणाले.