राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे शिवसेना-राष्ट्रवादीपुढे पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2022 12:17 AM2022-04-17T00:17:20+5:302022-04-17T00:31:52+5:30
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीचा संसार चालविणाऱ्या शिवसेनेला हिंदुत्व आणि रस्त्यावरील आंदोलने या मूळ प्रवृत्तीला काहीशी मुरड घालावी लागत असल्याचे पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्याच्या मागणीसाठी हनुमान चालिसाचा उपाय देऊन आघाडीच्या तिन्ही पक्षांपुढे पेच निर्माण केला आहे. नाशिक ही मनसे व राज ठाकरे यांची प्रयोगभूमी असल्याने त्यांचा समर्थक वर्ग मोठा आहे. ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख यांचे ठाण्याच्या जाहीर सभेत कौतुक करून नाशिकविषयी असलेला जिव्हाळा आणि मनसेच्या दृष्टीने असलेले महत्त्व अधोरेखित केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करा, अशी आग्रही भूमिका घेऊन राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीप्रमाणे कार्यक्रम दिला. सरकारमध्ये असल्याने सेनेला असलेल्या बंधनांना हेरून राठ ठाकरे यांनी ही रणनीती आखलेली दिसते.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीचा संसार चालविणाऱ्या शिवसेनेला हिंदुत्व आणि रस्त्यावरील आंदोलने या मूळ प्रवृत्तीला काहीशी मुरड घालावी लागत असल्याचे पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्याच्या मागणीसाठी हनुमान चालिसाचा उपाय देऊन आघाडीच्या तिन्ही पक्षांपुढे पेच निर्माण केला आहे. नाशिक ही मनसे व राज ठाकरे यांची प्रयोगभूमी असल्याने त्यांचा समर्थक वर्ग मोठा आहे. ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख यांचे ठाण्याच्या जाहीर सभेत कौतुक करून नाशिकविषयी असलेला जिव्हाळा आणि मनसेच्या दृष्टीने असलेले महत्त्व अधोरेखित केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करा, अशी आग्रही भूमिका घेऊन राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीप्रमाणे कार्यक्रम दिला. सरकारमध्ये असल्याने सेनेला असलेल्या बंधनांना हेरून राठ ठाकरे यांनी ही रणनीती आखलेली दिसते.
संजय राऊत यांच्याकडून सैनिकांना बळ
नाशिक महापालिका शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. वर्षभरापासून सुकाणू समिती गठित करून सेनेने निवडणुकीच्या नियोजनात आघाडी घेतलेली आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर शिवसैनिकांमध्ये काय प्रतिक्रिया आहेत, याची चाचपणी करण्यासाठी संपर्कनेते संजय राऊत दोन दिवसांच्या दौऱ्यावर नाशकात येऊन गेले. या दोन दिवसांतील त्यांचे कार्यक्रम आणि वक्तव्य पाहिले तर भाजपा, राज ठाकरे, किरीट सोमय्या यांच्यावर टीका करीत असतानाच शिवसैनिकांना पुन्हा हिंदुत्वाचा कार्यक्रम देण्यावर भर दिसून आला. काळाराम मंदिराला अचानक दिलेली भेट, आदित्य ठाकरे यांच्या लांबलेल्या अयोध्या दौऱ्याचा तपशील जाहीर करणे, यातून शिवसैनिकांना बळ देण्याचा प्रयत्न दिसून येतो. सेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण कार्यक्रमांना हजेरी लावून निवडणुकांच्या तयारीला लागण्याचा संदेश दिला. तोडफोड हा सेनेचा ब्रँड असल्याची आठवण करून देत शिवसैनिकांमधील मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला. ईडीने काही मालमत्तांवर टाच आणली असली तरी केंद्र सरकार व भाजपापुढे झुकणार नसल्याचे ठासून सांगितले.
भुजबळ, आव्हाड यांना केले लक्ष्य
राज ठाकरे यांनी ठाण्याच्या उत्तर सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतच छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य केले. गुढीपाडव्याच्या सभेनंतर या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली होती. पवार यांनी तर अर्ध्या तासाची स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांच्याविषयी २२ मिनिटे टिप्पणी केली. त्यामुळे ठाकरे यांनी ह्यउत्तरह्ण सभेतही पवारांना घेरले; पण भुजबळ यांना जेलवारी का घडली, याची आठवण करून दिली. आव्हाड हे मूळ नाशिककर, पण त्यांच्या मुंब्रा मतदारसंघातील दहशतवादी कारवायांविषयी राज ठाकरे सविस्तर बोलले. अल्पसंख्याक मुस्लिम समाज हा राष्ट्रवादीकडे मोठ्या आशेने बघतो. भोंग्याच्या वादावरून गृहमंत्रालय असलेल्या राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे पाटील यांनी ६० डेसिबलच्यावर भोंग्याचा आवाज नको, अशी भूमिका जाहीर केली. नंतर मात्र अल्टिमेटमला धुडकावत नियमांचे पालन करणारे भोंगे उतरविणार नसल्याचे स्पष्ट केले. ठाकरे यांच्या भूमिकेमुळे पक्ष व सरकार पेचात सापडले आहे.
काँग्रेस घेणार जनता दरबार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी सर्वोच्च न्यायालयात २१ एप्रिल रोजी काय निर्णय होतो, याविषयी सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या तर तयारीत राहावे या हेतूने आता काँग्रेस पक्षानेदेखील हालचाली सुरू केल्या आहेत. नाशिकचे प्रभारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी नाशिकमध्ये जनता दरबार घेणार आहेत. या जनता दरबाराच्या माध्यमातून नेते, कार्यकर्ते आणि सामान्य जनतेला शासकीय कार्यालयाशी संबंधित कामे मार्गी लावणे सोपे जाणार आहे. त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची भूमिका महत्त्वाची असल्याचा कार्यकर्ते व जनतेमध्ये संदेश देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. इतर पक्ष वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रम राबवीत असताना काँग्रेस पक्षात मात्र शांतता असल्याने कार्यकर्ते अस्वस्थ होते. छोटी आंदोलने करण्यापलीकडे श्रेष्ठींकडून कार्यक्रम येत नाही. जनता दरबाराच्या माध्यमातून ही अस्वस्थता दूर होण्याची शक्यता आहे. त्याचा लाभ आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला होऊ शकतो.
मालेगावातील अस्वस्थतेची दखल घ्या
देशभरातील वादाचे पडसाद मालेगावात तातडीने उमटतात. इतिहास चाळून बघितला, तर याचे अनेक दाखले मिळतील. गेल्या सहा महिन्यात मालेगावात अस्वस्थता, अशांतता निर्माण करण्याचे छोटे-मोठे प्रयत्न घडत आहे. त्यामागे राजकारण, धर्मकारण, अर्थकारण असेल; पण त्यामुळे मालेगावची शांतता बाधित होता कामा नये. हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य माणसाला पुन्हा दंगलीच्या खाईत ढकलू नये. यासाठी राजकीय पक्ष व प्रशासकीय यंत्रणेने कठोर भूमिका स्वीकारायला हवी. उपद्रवी मंडळींना हुडकून कायद्याचा बडगा दाखवायला हवा. कर्नाटकात हिजाब प्रकरण सुरू झाले, लगेच मालेगावात मोर्चा निघाला. जॉगिंग ट्रॅकचा विषय असाच तापला. राज ठाकरे यांच्या भोंग्याविषयीच्या भूमिकेच्या निषेधार्थ पीएफआयने निदर्शने केली. गडावर जाणाऱ्या भक्तांच्या डीजे वाहनावर दगडफेक झाली. दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वातावरण निर्माण करण्यात काय हशील? अराजक स्थितीचा फटका सामान्यांना बसतो, हे लक्षात घेऊन दोन्ही समाजांनी पुढे यायला हवे.
वंचितांचे जीवनमान कसे सुधारणार?
महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांची जयंती या आठवड्यात जल्लोषात साजरी झाली. वंचित घटकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार या दोन्ही महापुरुषांनी दिला. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही मागासवर्गीय समाजापर्यंत शासकीय योजना पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही. प्रशासकीय पातळीवर भेदाभेद केला जातो. मागासवर्गीय वस्तीतील विकास कामांचा निधी उच्चभ्रूंच्या वस्तीत वळवला जात असल्याचे वास्तव विधिमंडळाच्या अनुसूचित जाती जमाती कल्याण समितीच्या तीन दिवसीय दौऱ्यात समोर आले. आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या समितीने बारकाईने सर्व शासकीय कार्यालयांचा आढावा घेतला. मागासवर्गीयांच्या वस्तीत जाऊन विकास कामांची खातरजमा केली. त्यातून या धक्कादायक बाबी समोर आल्या. घटनाकार बाबासाहेबांना अपेक्षित असलेला दलित, वंचितांचा विकास आम्ही अजूनही साधू शकलो, नाही यापेक्षा दुर्दैव ते काय म्हणावे? राजकीय पक्ष, प्रशासकीय यंत्रणा यांनी केलेला कानाडोळा या अनास्थेला कारणीभूत आहे, हे नाकारुन चालणार नाही.