ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीत चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:19 AM2020-12-30T04:19:58+5:302020-12-30T04:19:58+5:30
पाच वर्षांत ग्रामपंचायत स्तरावर सर्वाधिक सरकारी कामे करणारी ग्रामपंचायत म्हणून लहवित गावची ओळख तयार झाली आहे. गेल्या पंचवार्षिक ...
पाच वर्षांत ग्रामपंचायत स्तरावर सर्वाधिक सरकारी कामे करणारी ग्रामपंचायत म्हणून लहवित गावची ओळख तयार झाली आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना समर्थक सरपंच तर उपसरपंचपदी राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी कार्यरत होते. यंदा मात्र गावातील राजकारणाची हवा बदलत असून, दोन गटांमध्ये निवडणूक होताना कोणत्या राजकीय गटाकडून कोणाला उमेदवारी मिळते, यावरच उमेदवारांच्या समर्थकांमध्ये चर्चा सुरू आहे. लहवितच्या मतदार यादीत थेट भगूर रस्त्यावर राहणारे व छावणी परिषदेत मतदानाचा हक्क बजावणारे मतदारांची संख्या मोठी आहे. लहवित गावातील दोन वाॅर्डांत या मतदारांचा प्रभाव राहू शकणार आहे. काँग्रेेेसचे ज्ञानेश्वर गायकवाड यांचे तगडे आव्हान नेमके कोणत्या गटाला असणार, त्यावर गावची राजकीय दिशा ठरणार आहे.
वंजारवाडी व लोहशिंगवे हे दोन्ही गावे तालुक्याचे शेवटचे टोक असून, दोन्ही गावांत शिवसैनिक मोठ्या संख्येने असले, तरी विधानसभेच्या मतदानात राष्ट्रवादीला येथून मोठी रसद मिळाली होती. वंजारवाडी येथे दर पंचवार्षिक निवडणुकीत नवीन चेहरा सरपंच होतो, हा मात्र नियम यंदाही राहण्याची शक्यता आहे. लोहशिंगवे येथे मागील निवडणुकीत शिवसेनाविरुद्ध लढत झाली होती. गावात अनेक कामे झाली, तरी गावाचा मुख्य रस्त्याचा प्रश्न कायम आहे. दोनवाडे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे व माजी सरपंच अशोक ठुबेंची एकहाती सत्ता अनेक वर्षांपासून असून, गावात पक्षापेक्षा सर्वांना एकत्रित बरोबर घेऊन चालणाऱ्या पद्धतीमुळे येत्या निवडणुकीत काही बदल होतो का नाही, हे बघावे लागणार आहे.
नानेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा इच्छुकांची संख्या अधिक असून, काही वाॅर्डात तर घरातच दोन उमेदवार उभे राहण्याबाबत घोषणा करताना समर्थक दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना, तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते. गावातून जाणारा नाशिक-पुणे रेल्वे मार्ग योग्य का अयोग्य, या मुद्द्याऐवजी बाहुबली समर्थक तू का मी, यावरच राजकीय वातावरण तापू लागले आहे. बेलतगव्हाण व शेवगेदारणा ही गावे शिवसेनेचे बाल्लेकिल्ले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीपासून येथील राजकारण बदलले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. शेवगेदारणा गाव छोटे असले, तरी राजकीय धुंरधर मात्र दर पंचवार्षिक निवडणुकीसाठी नवनवीन गणिते आखत असतात. उमेदवारी अर्ज भरण्यास बुधवारपासून सुरुवात झाली असून, तत्पूर्वीच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी समाजमाध्यमांवर प्रचार सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच कोण कोणाचे उमेदवार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.