एकलहरे गणात शिवसेनेला धक्का
By admin | Published: February 9, 2017 12:20 AM2017-02-09T00:20:42+5:302017-02-09T00:21:01+5:30
अनिल देसाई यांचे पत्र कुचकामी : सचिन ढिकलेंचा अर्ज बाद
नाशिक : शिवसेनेला महापालिकेसाठी दहा अपक्षांना पुरस्कृत करण्याची वेळ आलेली असतानाच तोच गोंधळ जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठीही कायम राहिल्याचे चित्र आहे. एकलहरे गणातील शिवसेनेचे उमेदवार तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के यांचा अर्ज काल बुधवारी (दि.८) निवडणूक निर्णय अधिकारी उन्मेश महाजन यांनी शिवसेनेचा उमेदवार म्हणून बाद ठरवित त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून जाहीर केले.
प्रकाश म्हस्के यांनी उन्मेश महाजन यांना शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांचे पत्र दिले होते. या पत्रात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के यांनाच धरण्यात यावे. शिवसेनेकडून सचिन जगताप व प्रकाश म्हस्के या दोघाही उमेदवारांना ए.बी. फॉर्म दिल्याचे म्हटले होते. मात्र अधिकृत उमेदवार म्हणून प्रकाश म्हस्केच आहेत, असे पत्रात म्हटले होते. मात्र सचिन युवराज जगताप यांनी ३ फेब्रुवारीलाच शिवसेनेकडून नामनिर्देशन पत्र भरून सोबत ए.बी. फॉर्मही भरले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्याचे नामनिर्देशनपत्र पक्षाकडून आधी भरलेले असेल, तसेच नामनिर्देशनपत्रासोबत पक्षाचा ए.बी. फॉर्म जोडला असेल त्यालाच अधिकृत धरण्यात यावे, या नियमानुसार सचिन जगताप यांनाच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी उन्मेश महाजन यांनी जाहीर केले. पळसे गणातूनही माधुरी तुंगार यांना शिवसेनेने ए.बी. फॉर्म देण्याचे जाहीर करून त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले, मात्र ऐनवेळी त्यांचा ए.बी. फॉर्म उज्ज्वला शिवाजी जाधव यांना दिल्याचा आरोप संजय तुंगार यांनी केला आहे. (प्रतिनिधी)