सिन्नर पंचायत समितीत शिवसेना
By admin | Published: February 24, 2017 12:17 AM2017-02-24T00:17:27+5:302017-02-24T00:17:38+5:30
सत्तापरिवर्तन : शिवसेनेला ८ तर भाजपाला ४ जागा; टपाल मतमोजणीने माळेगाव गणाचे चित्र बदलले
सिन्नर : पंचायत समितीच्या चुरशीच्या निवडणुकीत आमदार राजाभाऊ वाजे ेयांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत १२ पैकी ८ जागा मिळवून सत्ता परिवर्तन केले. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला केवळ ४ जागा मिळविता आल्या. त्यामुळे सिन्नर पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला.
निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल सोनवणे व तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणीस प्रारंभ झाला. सुरुवातीला चुरशीची वाटणारी निवडणूक शिवसेनेने एकहाती जिंकली.
शिवसेनेने नायगाव, माळेगाव, मुसळगाव, गुळवंच, नांदूरशिंगोटे, चास, डुबेरे, ठाणगाव या गणांत तर भाजपाने देवपूर, भरतपूर, पांगरी व शिवडे गणात विजय मिळविला. पांगरी वगळता प्रत्येक गणात शिवसेना व भाजपा यांच्यात सरळ लढत झाली. पांगरी गणात अपक्ष उमेदवार विजय काटे यांनी भाजपाचे उमेदवार रवींद्र पगार यांच्याशी अयशस्वी लढत दिली.
नायगाव : नायगाव गणात शिवसेनेचे उमेदवार संग्राम कातकाडे व भाजपाचे लक्ष्मण सांगळे यांच्यात लढत झाली. कातकाडे यांनी भाजपाचे उमेदवार सांगळे यांचा १ हजार २२३ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीचे उमेदवार मोहन कातकाडे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
माळेगाव : माळेगाव गणात चुरशीची लढत झाली. भाजपाचे उमेदवार शरद पवार यांनी शिवसेनेचे उमेदवार भगवान पथवे यांच्यावर ३ मतांनी आघाडी घेतली होती. टपाली मतमोजणीत पथवे यांना १६ तर पवार यांना केवळ ५ मते मिळाली. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार पथवे ८ मतांनी विजयी झाले.
मुसळगाव : मुसळगाव गणात शिवसेनेच्या सुमन राजाराम बर्डे यांनी भाजपाच्या कुसूम अनिल जाधव यांचा ९८१ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जयश्री अनिल पेढेकर तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
गुळवंच : गुळवंच गणात गेल्या निवडणुकीत कोकाटे समर्थकांचा विजय झाला होता. या निवडणुकीत शिवसेनेने या गटात बाजी मारली. शिवसेनेच्या उमेदवार रोहिणी कांगणे यांनी भाजपाच्या उमेदवार वर्षा भाबड यांचा ९२८ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीच्या अनिता कांगणे तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
देवपूर : देवपूर गण ताब्यात ठेवण्यात माजी आमदार कोकाटे यांना यश आले. या गणात भाजपाचे उमेदवार व माजी आमदार सूर्यभान गडाख यांचे पुत्र विजय गडाख यांनी शिवसेनेचे उमेदवार सीताराम गणपत गिते यांच्यावर विक्रमी ४ हजार ५०९ मतांनी विजय मिळविला. कॉँग्रेसचे उमेदवार रावसाहेब थोरात तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
भरतपूर : भरतपूर गणात भाजपाच्या उमेदवार योगीता बाबासाहेब कांदळकर यांनी शिवसेनेच्या उमेदवार जयश्री मच्छिंद्र चिने यांच्यावर ८१२ मतांनी विजय मिळविला.
पांगरी : पांगरी बुद्रुक गणात तिरंगी लढत पहायला मिळाली. भाजपाचे उमेदवार व शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र पगार यांनी पंचायत समितीच्या सभापती संगीता काटे यांचे पती व अपक्ष उमेदवार विजय काटे यांचा ५९८ मतांनी पराभव केला. शिवसेनेचे उमेदवार संपत पगार तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
नांदूरशिंगोटे : शिवसेनेच्या शोभा बर्के यांनी भाजपाच्या योगीता केदार यांचा ३ हजार २०३ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीच्या उमेदवार हिराबाई आव्हाड तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
चास : चास गणात दुरंगी लढत झाली. शिवसेनेचे जगन्नाथ भाबड यांनी बंडूनाना भाबड यांचे पुत्र व भाजपाचे उमेदवार राजेश भाबड यांचा ८३४ मतांनी पराभव केला.
डुबेरे : डुबेरे गणात शिवसेनेने विजय मिळविला. शिवसेनेच्या संगीता पावसे यांनी भाजपाच्या उमेदवार अंबिका बिन्नर यांच्यावर ३ हजार ५७१ मतांनी विजय मिळविला. मनसेच्या उमेदवार नंदाबाई कडाळे तिसऱ्या तर राष्ट्रवादीच्या सुवर्णा वाजे चौथ्या क्रमांकावर राहिल्या.
ठाणगाव : ठाणगाव गणात शिवसेनेने सहज बाजी मारली. शिवसेनेच्या उमेदवार वेणूबाई अशोक डावरे यांनी भाजपाच्या उमेदवार मंगला बाळासाहेब शिंदे यांचा ३ हजार १४० मतांनी पराभव केला.
शिवडे : गणात भाजपाचे तातू भागवत जगताप यांनी शिवसेनेचे उमेदवार रावसाहेब आढाव यांच्यावर अवघ्या २१७ मतांनी विजय मिळविला.
(वार्ताहर)