खरी कारसेवा शिवसेनेचीच, शिवसेना भरवणार नाशिकमध्ये प्रदर्शन
By संजय पाठक | Published: January 13, 2024 02:24 PM2024-01-13T14:24:18+5:302024-01-13T14:24:25+5:30
प्रचाराचा मुद्दा : पुरावे सादर करण्याची तयारी सुरू
संजय पाठक, नाशिक : बाबरी मशीद कोणी पाडली, यावरून भाजप आणि शिवसेनेच्या ठाकरे गटात जुंपली असताना आता कारसेवेचे खरे श्रेय ठाकरे गटाचेच आहे, हे दाखवण्यासाठी नाशिकमध्ये शिवसेना पुरावे सादर करणार आहे. यासंदर्भात एक
प्रदर्शनच भरवण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर १९९२ मध्ये अयोध्येत जाऊन कार सेवा करणाऱ्या शिवसैनिकांचा सत्कार नाशिकमध्ये करण्यात येणार आहे.
शिवसेनेचे महाशिबिर येत्या २२ आणि २३ जानेवारीला नाशिकमध्ये भरणार आहे. त्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. सध्या अयोध्येत प्रभु श्री रामचंद्रांचे मंदिर बांधले जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांना सुरुवातीला या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. नंतर ते देण्यात आले आहे.
मात्र, ते नाशिकला २२ जानेवारीला श्री काळाराम मंदिरात दर्शन घेऊन महाआरती करणार आहेत. दरम्यान, वादग्रस्त बाबरी ढांचा कोणी पाडला, यावरून दावे- प्रतिदावे सुरू असून शिवसैनिकांनीच हे काम केल्याचा दावा करण्यात आला तर दुसरीकडे शिवसेनेचा त्याच्याशी संबंध नव्हता, असा प्रतिदावा भाजपकडून यापूर्वीच करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेने हे काम केले हे दाखवण्यासाठी शिवसेना ठाकरे गट नाशिकमध्ये प्रदर्शन भरवणार आहे. कारसेवेत सहभागी शिवसैनिकांची कामगिरी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध मुलाखती, कारसेवेची छायाचित्रे, कारागृहात शिक्षा भोगून बाहेर पडतानाची छायाचित्रे तसेच डिस्चार्ज कार्ड प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.