नारायण राणेंसाठी शिवसेना रोज प्रार्थना करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:17 AM2021-08-29T04:17:54+5:302021-08-29T04:17:54+5:30
नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. त्यांना मानसिक आधाराची गरज आहे. त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ...
नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. त्यांना मानसिक आधाराची गरज आहे. त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी शिवसेना रोज सकाळी एक मिनिट प्रार्थना करणार आहे. भाजपनेही अशी प्रार्थना करावी तसेच नारायण राणे यांनीही योग-विपश्यनेसारखे पर्याय शोधावेत, असा खोचक सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला.
नाशिक भेटीवर आलेल्या संजय राऊत यांनी शिवसेना कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याबरोबरच प्रसिद्धिमाध्यमांच्या विविध प्रश्नांनाही उत्तरे दिले. भारतीय जनता पक्षाने नारायण राणे यांच्या खांद्याचा उपयोग करून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरू केली. त्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागले. वेळ पडली तर यापुढेही तेच होईल. परंतु भाजपाने ज्या पद्धतीने राणे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारल्या ते पाहता, आमच्याकडे शिवसैनिकांचे खांदे भरपूर आहेत. त्याचा उपयोग करू देण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशाराही राऊत यांनी बैठकीत दिला. शिवसेनेतून अनेक गेले, अनेक आले, परंतु राणे यांच्यासारखा उतमात कोणी केला नाही. शिवसेेनेसमोर ज्यांचे वेडेवाकडे पाऊल पडले ते संपले असे सांगून, शिवसैनिकांना नाशिकमध्ये दगड का हातात घ्यावे लागले याचे आत्मपरीक्षणही संबंधितांनी करावे असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीस संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, ग्रामीण जिल्हा प्रमुख सुनील पाटील, सुनील बागुल, वसंत गिते, विनायक पांडे, यतीन वाघ, शोभा मगर, अजय बोरस्ते, विलास शिंदे यांच्यासह सर्व नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट----
राऊत यांनी केले शिवसैनिकांचे कौतुक
आपल्या भाषणात राऊत यांनी नाशिकच्या शिवसैनिकांचे कौतुक केले. नाशिकमध्ये नारायण राणे यांच्याविरुद्ध पहिला गुन्हा दाखल झाला. त्यावेळी पुढच्या एक तासात काय होईल हे कोणालाच माहिती नव्हते. हे काम करण्यासाठी नाशिकशिवाय पर्याय नव्हता. तेच नाशिकच्या शिवसैनिकांनी करून दाखविले. भविष्यात नाशिक हे महाराष्ट्राला मार्गदर्शक व दिशादर्शक म्हणून राहील, असे गौरवोद्गारही राऊत यांनी काढताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
चौकट===
छत्रपती महाराष्ट्राचे कायम पुढारीच
नारायण राणे यांनी छत्रपती खासदार संभाजी राजे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना छत्रपती हे कायम महाराष्ट्राचे पुढारीच असतात, हे राणेंना कोणीतरी सांगावे लागेल, छत्रपतींच्या वंशजांविषयी सर्वांनाच आदर आहे. छत्रपती खासदार संभाजी राजे भाजपचे संसद भवनातील सहयोगी सदस्यही आहेत. मराठा आंदोलनाचे नेतृत्व करीत असताना त्यांना संसदेत बोलण्यासाठी केवळ दोन मिनिटांचा वेळ दिला, त्यांना बोलू दिले जात नसताना भाजपचे खासदार कोठे होते, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
--