नेते म्हणतात आमचं ठरलंय, तरीही युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 10:13 AM2019-07-16T10:13:09+5:302019-07-16T10:13:53+5:30
देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांच्यावर लोकांचा विश्वास आहे, शिवसेनेबरोबर भाजपाची युती आहेच. मात्र कोणीही कल्पना विलास केला तरी मुख्यमंत्री भाजपाचाच होणार असं सरोज पांडे यांनी सांगितले होते.
नाशिक - मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपाचे नेते आमचं ठरलंय असं म्हणत असले तरी शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचा दावा कायम असल्याचा दिसत आहे. नाशिकमधील शिवसेना कार्यकर्त्यांनी शहरात युती असली तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच अशा आशयाचे पोस्टर्स लावले आहेत. भाजपा प्रभारी सरोज पांडे यांनी सोमवारी नाशिकमध्ये केलेल्या विधानावरुन शिवसेनेने हे पोस्टर्स लावले असल्याचं सांगण्यात येत आहे.
भाजपाच्या प्रभारी सरोज पांडे नाशिक दौऱ्यावर होत्या. त्यावेळी माध्यमांशी बोलताना सरोज पांडे यांनी महाराष्ट्रात युती असली तरी मुख्यमंत्री भाजपाचाच होणार असं विधान केलं होतं. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून संघटनात्मक कामांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी सरोज यांनी सांगितले की, भाजपा हा देशात अत्यंत मजबुत पक्ष झाला आहे. अनेक पक्षातून लोक भाजपात येण्यास तयार आहेत. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांच्यावर लोकांचा विश्वास आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की , शिवसेनेबरोबर भाजपाची युती आहेच. मात्र कोणीही कल्पना विलास केला तरी मुख्यमंत्री भाजपाचाच होणार हे स्पष्ट केले.
सरोज पांडे यांच्या या विधानावरुन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये ही पोस्टरबाजी केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने भाजपाशी जुळवून घेत युती केली होती. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन ही युती घडवून आणली होती. नेमकं या दोघांच्या बैठकीत काय चर्चा झाली यावरुन विविध तर्कवितर्क लढविले गेले. शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल ही भूमिका शिवसेनेने घेतली आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावेळीही पुढील वर्धापनदिनी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असं सामना संपादकीयमधून सांगण्यात आलं होतं.
शिवसेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांच्या चर्चेकडे दुर्लक्ष करा आमचं ठरलंय अशाप्रकारे मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाला बगल दिली होती. उद्धव ठाकरेंनीही अप्रत्यक्षरित्या सगळं समसमान असावं असं वक्तव्य कार्यक्रमात केलं होतं. त्यामुळे शिवसेना-भाजपाच्या युतीत मुख्यमंत्री कोण होणार यावर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. नेते जरी आमचं ठरलंय असं म्हणत असले तरी कार्यकर्ते आमचाच मुख्यमंत्री होणार असं सांगत आहेत. त्यामुळे नेते एकत्र असले तरी कार्यकर्त्यांमधील धुसफूस संपताना काही दिसत नाही.