शिवसेना - भाजपाचा उमेदवार ठरविताना कसरत
By admin | Published: January 29, 2017 12:40 AM2017-01-29T00:40:51+5:302017-01-29T00:41:07+5:30
जेलरोड प्रभाग : इच्छुकांची गर्दी; राजकीय गणित बदलले; अद्याप चित्र स्पष्ट नाही
मनोज मालपाणी : नाशिकरोड
जेलरोड प्रभाग १८ मध्ये इच्छुकांची झालेल्या गर्दीमुळे शिवसेना-भाजपाला उमेदवारी ठरवितांना मोठी कसरत करावी लागणार आहे. तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी व मनसेकडे त्या-त्या जागेपुरते उमेदवार आहेत. शिवसेनेचे इच्छुक उमेदवार सुरेंद्र शेजवळ यांच्या हत्त्येमुळे निवडणुकीचे राजकीय गणित बदलून गेले आहे. केंद्रात व राज्यातून कॉँग्रेस - राष्ट्रवादी व मित्रपक्ष सत्तेतून पायउतार झाल्यामुळे त्यांच्यामध्ये कमालीचा सुस्तपणा व अनुत्साहाचे वातावरण दिसत आहे, तर शिवसेना - भाजपाला ‘उन्हाळ्यात पालवी’ फुटावी असे दिवस आले आहे, तर मनसेकडे प्रत्येक जागेवर इच्छुक आहेत. शिवसेनेकडून अनुसूचित जाती गटातून प्रबळ दावेदार असलेले सुरेंद्र शेजवळ यांची नुकतीच पूर्ववैमनस्यातून हत्त्या झाल्याने राजकीय गणित बदलले आहे.
शिवसेनेकडून सर्वसाधारण गटातून मनसेतून शिवसेनेत दाखल झालेले अशोक सातभाई व अपक्ष नगरसेवक राहिल्यानंतर राष्ट्रवादीतून सेनेत दाखल झालेले अॅड. सुनील बोराडे दोघे प्रबळ दावेदार आहेत. सातभाई हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक तर बोराडे हे पूर्वाश्रमीचे भाजपाचे खंदे कार्यकर्ते होते. येथील उमेदवारी निश्चित करताना सेनेला येथे नक्कीच नाकीनव येणार आहे. इतर मागासवर्ग महिला गटातून राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेल्या रंजना बोराडे, कट्टर शिवसैनिक विक्रम खरोटे यांच्या मातोश्री सुशीला खरोटे, लता बाळासाहेब ढिकले या इच्छुक आहेत. अनुसूचित जाती गटातून मनसेचे नगरसेवकपद रद्द झालेल्या शोभना शिंदे, बाळासाहेब अहिरे, खिलेंद्र मोबीया हे इच्छुक आहे. या गटातून सेनेचे प्रबळ दावेदार असलेले सुरेंद्र शेजवळ यांची हत्त्या झाल्याने अडचण निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या पोट निवडणुकीत शेजवळ यांच्या मातोश्री मनसेकडून लढल्या होत्या. सर्वसाधारण महिला गटातून विभागप्रमुख शिवा ताकाटे यांच्या पत्नी शीतल ताकाटे, चित्रा ढिकले, मुक्ता पोरजे, वृषाली नाठे इच्छुक आहेत. इतर पक्षांतून दाखल झालेले व पक्षातील जुने कार्यकर्ते यामुळे उमेदवारी ठरवितांना बंडखोरी टाळण्यासाठी सेनेला चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
भाजपामध्ये रस्सीखेच
भाजपाने निवडणुकीच्या तोंडावर अनेकांना पक्षात प्रवेश दिल्याने जुने-नवीन असा वाद निर्माण झाला आहे. सर्वसाधारण गटातुन युवा मोर्चाचे प्रदेश चिटणीस सचिन हांडगे व शिवसेनेतून दाखल झालेले विशाल संगमनेरे इच्छुक आहेत. इतर मागासवर्ग महिला गटातून भाजपा महिला आघाडी अध्यक्ष मंदा फड शिवसेनेकडून निवडणूक लढविलेल्या रंजना तुंगार, सुलोचना बोराडे, छाया मुकुंद आढाव, मीना सानप, चंद्रकला साबळे तर सर्वसाधारण महिला गटातून नगरसेवक मंदाबाई ढिकले, वंदना बोराडे, जिजाबाई बोराडे, किरण शहाणे, उषा शहाणे या इच्छुक आहेत. विशेष म्हणजे जिजाबाई बोराडे व छाया आढाव यांचे आई-मुलीचे नाते आहे. अनुसूचित जाती गटातून शरद मोरे, कुलदीप गवई, बाळासाहेब अस्वले दावेदार आहेत. अपक्ष नगरसेवक पवन पवार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असला तरी त्यांची पक्षाच्या मुलाखतीला गैरहजेरी होती. त्यामुळे पवार किंवा त्यांचा भाऊ विशाल याला उमेदवारी दिली जाते किंवा पवन पवार ऐन निवडणुकीत काय भूमिका घेतात यावर प्रभागाच्या निवडणुकीत बरेच काही अवलंबून आहे. पवार यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला तर इतर पक्षांतील नाराजांच्या मदतीने अपक्षांचा पॅनल निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.