चारा छावण्यांसाठी शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा
By admin | Published: March 8, 2016 10:48 PM2016-03-08T22:48:49+5:302016-03-08T22:50:29+5:30
चारा छावण्यांसाठी शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा
येवला : शेतकऱ्यांचा जनावरांसह आंदोलनात सहभागयेवला : तालुक्यात जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्यात याव्यात, वाड्या-वस्त्या तसेच ग्रामीण भागातील जनतेला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, यांसह विविध मागण्यांसाठी येवला तहसील कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता.
शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे, युवानेते संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, जनावरांना चारा मिळालाच पाहिजे, पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे, अशा विविध घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला.
यावेळी बोलताना सुहास कांदे म्हणाले की, येवला तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवावा. जनावरांना मुबलक चारा मिळावा म्हणून चारा छावण्या उभारण्यात याव्यात. या मागण्या मार्गी न लागल्यास महसूल विभागाच्या विरोधात शिवसेना तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा सुहास कांदे यांनी यावेळी दिला. संभाजीराजे पवार, भास्कर कोंढरे पाटील, चंद्रकांत शिंदे, झुंजार देशमुख, वाल्मीक गोरे, सर्जेराव सावंत, राजेंद्र लोणारी यांचीही भाषणे झाली.
दरम्यान, तहसीलदार शरद मंडलिक यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात दीपक भदाणे, राहुल लोणारी, भगिनाथ थोरात, रु पेश लोणारी, महेश सरोदे, चंद्रमोहन मोरे, नितीन संसारे, समीर समदडिया, दिलीप मेंगाळ, रतन बोरनारे, कैलास घोरपडे आदिंसह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. (वार्ताहर)