राम मंदिरासाठी शिवसेनेचे योगदान सांगण्याची गरज नाही; महाअधिवेशनात उद्धव ठाकरेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 07:58 AM2024-01-24T07:58:54+5:302024-01-24T07:59:01+5:30
नाशिकमध्ये मंगळवारी आयोजित शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महाअधिवेशनाचा समारोप हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या सभेने झाला.
नाशिक : एरव्ही सनातन धर्मावर कुणी बोललं की त्याला जाब विचारला जातो. मग तुमच्याच पक्षातील एक मंत्री हिंदू धर्मात शंकराचार्यांचे योगदान काय, असा प्रश्न उपस्थित करतो तेव्हा कुणीच का बोलत नाही. भाजपमध्ये शंकराचार्यांचा अवमान आणि भ्रष्टाचाऱ्यांना स्थान असेल तर मग तुम्ही सनातन धर्म मानता की नाही, असा प्रश्न विचारत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. श्रीराम मंदिरासाठी शिवसेनेचे योगदान काय, हे इतरांना सांगण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
नाशिकमध्ये मंगळवारी आयोजित शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महाअधिवेशनाचा समारोप हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या सभेने झाला. यावेळी त्यांनी धर्मावर अधर्माचे संकट आल्याने ‘दार उघड, बये दार उघड’ असे जगदंबा मातेला साकडे घालत सभेला सुरुवात केली. श्रीराम आमच्या श्रद्धेचा विषय असून राममंदिरासाठी शिवसेनेचे योगदान मोठे असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी, काश्मीरमधील कलम ३७० रद्द करावे यासाठीच आम्ही भाजपला पाठिंबा दिला होता, असेही ते म्हणाले.
२०१४ला शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे काय करणार, असा विचार करत दिल्लीत शिवसेनेला संपविण्याचा विचार झाला होता, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. त्यावेळी शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले. भाजपने दिलेले वचन मोडलं नाहीतर फडणवीस हे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते, असे ठाकरे म्हणाले.