शिवसेनेचा ‘धडक मोर्चा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:47 IST2018-10-06T01:47:15+5:302018-10-06T01:47:25+5:30
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर आणि त्यामुळे वाढत असलेली महागाई या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी (दि. ५) जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी घेऊन धडक मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे त्यात कडक लक्ष्मीचे पारंपारिक लोककलावंत आसूड ओढून घेत सहभागी झाले होते.

शिवसेनेचा ‘धडक मोर्चा’
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर आणि त्यामुळे वाढत असलेली महागाई या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी (दि. ५) जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी घेऊन धडक मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे त्यात कडक लक्ष्मीचे पारंपारिक लोककलावंत आसूड ओढून घेत सहभागी झाले होते.
शिवसेनेच्या वतीने जिल्हाभर शुक्रवारी (दि. ५) मोर्चे काढण्यात आले होते. नाशिक शहरात शालिमार चौकातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून निघालेला मोर्चा सीबीएसमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोदी सरकारच्या अच्छे दिन आणि गाजर दाखविण्याच्या संदर्भातील घोषणा तसेच शिवसेनेचा जयजयकार करत हा मोर्चा काढण्यात आला. विशेषत: बैलगाडी आणि कडक लक्ष्मीच्या लोककलावंतांचा सहभाग लक्षवेधी होता.
यावेळी मोर्चेकऱ्यांतर्फे भूसंपादन उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांना निवेदन देण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा घटक असलेल्या इंधनाच्या दरात रोज होत असलेली दरवाढ ही केंद्र शासन जाणीवपूर्वक करतेय की काय, असे नागरिकांना वाटत आहे. दुष्काळ व महामार्गावरील दारूबंदीचा सेस कमी केल्यास पेट्रोलचे दर आणखी पाच ते सात रुपयांनी स्वस्त होतील, असे निवेदनात म्हटले असून, पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी त्यांना जीएसटी लागू करावा अशी मागणी माजी मंत्री बबनराव घोलप, खासदार हेमंत गोडसे, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजरकर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सचिन मराठे व महेश बडवे, माजी महापौर विनायक पांडे, मनपातील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, मनपातील गटनेता विलास शिंदे यांनी केली. या मोर्चात निवृत्ती जाधव, मंदा दातीर, श्यामला दीक्षित, दीपक दातीर, राहुल ताजनपुरे, रवींद्र जाधव, दिलीप मोरे, सचिन बांडे, सुनील जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.
महागाईच्या मोर्चात नोटांची उधळण
शिवसेनेच्या वतीने महागाईच्या विरोधात जिल्हाभर मोर्चे काढण्यात आले असताना नाशिकमध्ये एका पदाधिकाºयाने नोटांची केलेली उधळण हा चर्चेचा विषय ठरला. मोर्चा लक्षवेधी ठरावा यासाठी शिवसेनेच्या मोर्चात अंगावर आसूड ओढून घेणारे कडक लक्ष्मीचे लोककलावंत सहभागी झाले होते. हे खरेच पारंपरिक व्यावसायिक असले तरी त्यामुळे मोर्चातील गांभीर्याला वेगळेच वळण लागले. विशेषत: महागाईच्या विरोधात मोर्चा असताना या कलावंतांवर चक्क नोटांची उधळण केली तसेच शारीरिक कसरती करून शंभर रुपयांची नोट उचलण्यास भाग पाडले. हा सर्व प्रकार काही नेत्यांच्या लक्षात येताच त्यांनी या नवनिर्वाचित पदाधिकाºयाची खरडपट्टी काढली आणि हा महागाईच्या विरोधातील मोर्चा आहे इतके तरी भान ठेवा असे बजावले; परंतु तोपर्यंत नोटा उधळण्याचा प्रकार उपस्थित नागरिकांनीदेखील बघितला होता.