शिवसेनेचा जिल्हाध्यक्षही वादात
By Admin | Published: December 31, 2016 01:27 AM2016-12-31T01:27:11+5:302016-12-31T01:27:31+5:30
भूखंड प्रकरण : तीन कोटींचा अपहार; कांदे यांच्या जामिनावर १० जानेवारीला युक्तिवाद
नाशिक : बनावट नोटा छपाई प्रकरणातील राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षापाठोपाठ शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्षही वादात सापडले आहेत़ महात्मानगरमधील भूखंड खरेदी-विक्री प्रकरणातील तीन कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील संशयित शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख तथा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुहास कांदे यांच्या अटकपूर्व जामिनावर जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱ आऱ वैष्णव यांच्या न्यायालयात १० जानेवारीला दोन्ही पक्षांच्या वकिलांचा युक्तिवादानंतर निर्णय होणार आहे़ कांदे सध्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर आहेत़ गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महात्मानगर येथील भूखंड खरेदीसाठी बनावट महिला उभी करून बनावट दस्तावेज बनवत संशयित अतुल भंडारी, अहमद खान, फरहान खान व आणखी तिघा संशयितांनी दुय्यम निबंधक कार्यालयात तीन कोटी रुपयांना भूखंड खरेदी केल्याचे खरेदीखत नोंदविले होते़ या प्रकरणी भूखंडाचे मूळमालक श्रीमती सिंग यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार कांदे यांच्या मेव्हण्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल आहे़ पोलीस तपासात कांदे यांचा सहभाग उघड झाल्याने या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे़
पोलिसांनी केलेल्या तपासात सुहास कांदे यांच्या इशाऱ्यावरच भंडारी याने बनावट कागदपत्रे तयार केलीत. तसेच शीला सावंत या वृद्धेला पैशांचे आमिष दाखवून ती भूखंडमालक आहे, असे भासवून खरेदी दिली़ या महिलेच्या नावाने एनडीसीसी बँकेत बनावट खाते उघडले, बँकेचे उपाध्यक्ष कांदे असल्याने त्यांच्या आदेशावरून व्यवस्थापकाने बोगस खाते उघडण्यास मदत केल्याचे समोर आले़ या प्रकरणात बुधवारी कांदे यांची चौकशीही करण्यात आली आहे़ दरम्यान, भूखंड खरेदी प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही. राजकीय कारणातून आपल्याला यात गोवण्यात येत आहे, या खोट्या गुन्ह्णात अडकविले जाऊ नये यासाठीच आपण अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असल्याचा दावा सुहास कांदे यांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपी अतुल भंडारी याच्या आईला आपण मनमाड नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी दिली नाही, त्यामुळेच सुडापोटी माझे नाव गोवण्यात आले आहे. तपासी अधिकारी मैनकर हेदेखील स्वार्थासाठी माझे नाव घेत आहेत असे कांदे यांनी म्हटले असून, आपण जिल्हा सत्र न्यायालयाकडे दाद मागितल्यानंतर न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा बॅँकेत कोणते खाते उघडले जाते याच्याशी माझा संबंध नाही, उलट यावादात जिल्हा बॅँकेत खाते उघडण्यात आल्याचे कळाल्यानंतर त्याचीही चौकशी करण्याचे आपण आदेश दिल्याचे कांदे यांनी पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, कांदे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला असून, अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे़, तर अटकपूर्व जामिनावर १० जानेवारीला युक्तिवाद होऊन त्यानंतर न्यायालय निर्णय देणार आहे़ जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केल्यास त्याविरोधात उच्च न्यायालयातही दाद मागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले़ (प्रतिनिधी)