भाजप कार्यालयासमोर शिवसेनेचे ‘श्वान’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:15 AM2021-03-17T04:15:23+5:302021-03-17T04:15:23+5:30
स्फोटक प्रकरणात नितेश राणे यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासंदर्भात बोलताना सेना नेत्यांवर आरोप केले आहेत आणि शिवसेनेच्या ...
स्फोटक प्रकरणात नितेश राणे यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासंदर्भात बोलताना सेना नेत्यांवर आरोप केले आहेत आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या चौकशीची मागणीदेखील केली आहे. त्याचे पडसाद मंगळवारी (दि.१६) नाशकात उमटले. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी ११ वाजता एनडी पटेल रोडवरील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयासमोर दोन जर्मन शेफर्ड नेले आणि त्यांच्या गळ्यात राजकीय नेत्यांच्या नावाच्या पाट्या लाऊन घोषणाबाजी केली. भाजपाचा निषेध करताना शिवसेना नेत्यांचा जयघोष केला. हा प्रकार घडला तेव्हा भाजप कार्यालयात कोणी मुख्य पदाधिकारी नव्हते. सुमारे १५ ते २० मिनिटांनी पोलीस त्याठिकाणी आले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना हटवले. जिल्हाध्यक्ष दीपक दातीर यांच्या नेतृत्वाखाली रूपेश पालकर, अजिंक्य बोरस्ते, प्रवीट चव्हाण, नीलेश शिरसाठ, यश ठाकूर यांनी हे आंदोलन केले.
दरम्यान, एकीकडे कोरोनाचा कहर असल्याने सामान्य नागरिकांवर निर्बंध असताना दुसरीकडे मात्र राजकारणासाठी नियम भंग करून शिवसेनेने अत्यंत खालच्या दर्जाचे आंदोलन केले. त्यामुळे या आंदाेलकांवर जमावबंदीचा भंग आणि साथ रोगप्रतिबंधक आंदोलन केल्याबद्दल गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजपाने केली. भाजपाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. यात जगन पाटील, श्याम बडोदे, भास्कर घाेडेकर, प्रशांत वाघ, पवन उगले, विनोद येवले, निखील कुंदलवाल सहभागी झाले होते. सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना याठिकाणी आल्यानंतर त्यंनी भाजपची बाजू ऐकून घेतली आणि गुन्हा दाखल करून घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
इन्फो...
प्राण्यांचा सहभाग कसा काय?
राजकीय आंदोलनात प्राण्यांचा सहभाग केल्याबद्दलदेखील भाजपने आक्षेप नोंदवला असून, त्यासंदर्भातदेखील मुक्या जनावरांचा वापर केल्याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.