राजदंड घेण्यावरुन रस्सीखेच, महापालिकेच्या महासभेत शिवसेनेचा प्रचंड गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 01:02 PM2021-01-19T13:02:10+5:302021-01-19T13:02:53+5:30
नाशिकरोडचा पाणी प्रश्न गाजला, सभा दहा मिनिटांसाठी तहकूब
नाशिक- महापालिकेच्या महासभेत पाणीपुरवठ्याच्या विषयावर आज अभूतपूर्व गोंधळ झाला आणि महापौरांना सभागृहाचे कामकाज थांबावे लागेल मात्र त्यानंतरही शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये राजदंड घेण्यावरून रस्सीखेच सुरू झाली. त्यामुळे भाजप आणि सेनेच्या नगरसेवकात चांगलीच जुंपली.
नाशिक महापालिकेची महासभा आज दुपारी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर नाशिक रोड येथील नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला आणि नाशिकरोड परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे त्यावर काय कार्यवाही करणार याबाबत प्रश्न उपस्थित केला. नाशिकरोड विभागासाठी 16 कोटी रुपये खर्च करून पाईपलाईन टाकण्यासाठी निविदा मागविण्यात आली असल्याचे सांगूनही शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. महापौरांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या नगरसेवकांनी गोंधळ सुरू केला आणि महापौर ज्या स्थायी समितीच्या सभागृहातून सभा संचलित करत होते त्या ठिकाणी सत्यभामा गाडेकर, रमेश धोंगडे, प्रशांत दिवे, सूर्यकांत लवटे, ज्योती खर्जुल यांच्यासह अन्य नगरसेवकांनी धाव घेतली आणि महापौरांना जाब विचारणे सुरु केले.
महापौर त्याला प्रत्युत्तर देत असताना त्यांचे ऐकूनही न घेता शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रचंड गोंधळ घातला त्यातच काही वेळाने विरोधी पक्षने अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे यांच्यासह अन्य नगरसेवक याठिकाणी दाखल झाले त्यानंतर गोंधळ आणखीनच वाढला रमेश धोंगडे, प्रशांत दिवे, सूर्यकांत लवटे यांच्यासह काही नगरसेवकांनी महापौरांच्या पुढ्यात ठिय्या घातला. महापौर त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतानाही शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांचे ऐकून न घेता घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे महापौरांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करत असल्याचं सांगितलं त्यानंतरीही 'उत्तर द्या, उत्तर द्या महापौर उत्तर द्या' अशा घोषणा दिल्या या गोंधळात महापौर गर्दीतून वाट काढून कसेबसे बाहेर पडले त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांच्या टेबलावर ठेवलेल्या राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपाच्या नगरसेवकांनी तो घेऊ दिला नाही मुळात ही सभा तहकूब झाले असताना देखील दोन्ही पक्षातून अकारण सुरू असलेली राजदंडाची रस्सीखेच बघून अधिकारीदेखील बाहेर पडले भाजपाचे सभागृह नेते सतीश सोनवणे आणि गटनेते जगदीश पाटील यांनी विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र शिवसेनेच्यावतीने गोंधळ सुरूच ठेवला. काही वेळाने हा गोंधळ थांबला.