शिवसेनेची आघाडी; भाजपात बिघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:30 AM2017-09-17T00:30:10+5:302017-09-17T00:30:20+5:30
महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळविलेल्या भाजपात अद्यापही तीन स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याबाबत एकमत झालेले नाही. आयुक्तांनी दिलेली मुदत संपूनही भाजपाला उमेदवारांचे अर्ज सादर करता आले नाही तर शिवसेनेची यादी तयार असताना भाजपाच्या विनंतीवरून सेनेनेही आपल्या उमेदवारांचे अर्ज सादर केले नाही.
नाशिक : महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळविलेल्या भाजपात अद्यापही तीन स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याबाबत एकमत झालेले नाही. आयुक्तांनी दिलेली मुदत संपूनही भाजपाला उमेदवारांचे अर्ज सादर करता आले नाही तर शिवसेनेची यादी तयार असताना भाजपाच्या विनंतीवरून सेनेनेही आपल्या उमेदवारांचे अर्ज सादर केले नाही. भाजपाने आता आयुक्तांकडे आणखी महिनाभराची मुदत मागितली आहे, तर आयुक्तांनी कायदेशीर सल्ला घेऊनच पुढील कार्यवाही करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपाच्या या घोळात स्वीकृत सदस्यांची नियुक्ती प्रक्रिया पुन्हा रखडली आहे.
महापालिकेत तौलनिक संख्याबळानुसार सत्ताधारी भाजपाचे तीन, तर शिवसेनेचे दोन स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. वास्तविक महापालिका प्रांतिक अधिनियमानुसार, निवडणूक झाल्यानंतर महिनाभरात सदर नियुक्ती प्रक्रिया राबविणे आवश्यक होते. परंतु, भाजपामध्ये तीन जागांसाठी दीडशेहून अधिक इच्छुक असल्याने मुहूर्त लांबत गेला. दरम्यान, आयुक्तांनी सुरुवातीला २१ आॅगस्टपर्यंत इच्छुक उमेदवारांचे अर्ज सेना-भाजपाच्या गटनेत्यांना देण्यास सांगितले होते.