नाशिकमध्ये शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंचा अर्ज वैध, राष्ट्रवादीची हरकत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 04:42 AM2018-05-05T04:42:03+5:302018-05-05T04:42:03+5:30
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी नाट्यमय घटना घडून शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी हरकत घेतल्याने मोठा कायदेशीर पेच प्रसंग निर्माण होऊन तब्बल बारा तास निवडणूक अधिकाऱ्यांनी खल केला.
नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी नाट्यमय घटना घडून शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी हरकत घेतल्याने मोठा कायदेशीर पेच प्रसंग निर्माण होऊन तब्बल बारा तास निवडणूक अधिकाऱ्यांनी खल केला. सहाणे यांनी घेतलेल्या आक्षेपावर रात्री ११.३० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी निर्णय देत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अर्ज वैध ठरविला.
या निर्णयामुळे शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसने या निकालाविरुद्द उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले. आता खरी लढत शिवसेनेचे नरेंद्र दराडे, राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे व जिल्हा विकास आघाडीचे परवेझ कोकणी यांच्यामध्ये होणार आहे. शुक्रवारी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकाºयांनी गर्दी केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता.
नरेंद्र दराडे यांनी आपला अर्ज ज्या प्रतिज्ञापत्रावर सादर केला ते अर्धवट व चुकीचे असल्याचा आक्षेप सहाणे यांनी नोंदवून लेखी हरकत घेतली होती. त्यानंतर सहाणे यांनी पुन्हा नव्याने हरकत नोंदवित दराडे यांचा अर्ज अवैध ठरवावा, अशी विनंती केली.