निवडणुकीनंतर सिडकोत शिवसेनेची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:27 AM2019-11-23T00:27:15+5:302019-11-23T00:27:56+5:30
नाशिक महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक सेनेच्या माघारीनंतर बिनविरोध पार पडल्यानंतर शिवसेनेकडून महापौरपदाचे दावेदारी करणाऱ्या नगरसेवकांनी सिडकोतील भाजपच्या काही नगरसेवकांच्या घरी जाऊन भेटी घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली
नाशिक : नाशिक महापालिकेच्या महापौरपदाचीनिवडणूक सेनेच्या माघारीनंतर बिनविरोध पार पडल्यानंतर शिवसेनेकडून महापौरपदाचे दावेदारी करणाऱ्या नगरसेवकांनी सिडकोतील भाजपच्या काही नगरसेवकांच्या घरी जाऊन भेटी घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून, महापौर निवडीनंतर शिवसेना आता कोणती नवीन चाल खेळणार याविषयी विविध अंदाज बांधले जात आहेत.
नाशिक महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक भाजपविरुद्ध सेना अशीच होणार असल्याचे पहिल्या दिवसांपासूनच स्पष्ट झालेले असल्यामुळे दोन्ही बाजूंकडून दगाफटका होऊ नये याची काळजी घेण्यात येत होती. भारतीय जनता पक्षाला स्वत:चे नगरसेवक फुटण्याची भीती वाटत असल्याने त्यांनी काही दिवस अगोदरच नगरसेवकांना सहलीसाठी नेऊन अन्य पक्षांच्या संपर्काबाहेर ठेवले होते असे असले तरी, सेनेकडून भाजपच्या नगरसेवकांना फोडण्यात यश आल्याचा दावा अखेरच्या क्षणापर्यंत करण्यात आला, तर भाजपच्या काही नगरसेवकांनी उघड उघड बंड केल्याचेही समोर आले होते. महापौरपदासाठी एकेक मत महत्त्वाचे असल्याने भाजप, सेनेकडून त्यासाठी जोरदार रस्सीखेच करण्यात आले. निवडणुकीच्या अखेरच्या क्षणापर्यंत या संदर्भातील उत्कंठा वाढीस लागलेली असताना ऐन सभागृहात शिवसेनेने महापौर व उपमहापौरपदाची निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे भाजपचा मार्ग निर्धोक झाला. या निवडणुकीनंतर मात्र शिवसेनेचे महापौरपदाचे दावेदार असलेल्या नगरसेवकांनी धावपळ करीत थेट सिडकोत धाव घेतली. सेनेतील हे वरिष्ठ नगरसेवकांबरोबर सिडकोतील सेनेचे अन्य नगरसेवक तसेच प्रमुख पदाधिकारीही सहभागी झाले होते. सेनेच्या नगरसेवकांचा ताफा थेट भाजपच्या नगरसेवकांच्या दाराशी जाऊन थांबल्यामुळे राजकीय चर्चेला सुरुवात झाली. महापौरपदाची निवडणूक पार पडलेली असताना व त्यातून सेनेने माघार घेतलेली असताना पुन्हा भाजपच्या काही ‘विशिष्ट’नगरसेवकांच्या घरी जाऊन केलेल्या चहा-पाणीमुळे सेना व भाजप अशा दोघांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त करण्यात आला. महापौर निवडणुकीनंतर अवघ्या काही वेळानंतरच सेनेने ज्या तत्परतेने भाजपच्या नगरसेवकांच्या घरी हजेरी लावली ते पाहता, त्यांच्यात नेमकी काय खलबते झाले याविषयी अंदाज वर्तविण्यात येत आहेत. मात्र भाजप नगरसेवकाच्या घरातून परतणाºया सेनेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या चेहºयावर ‘काम फत्ते’ झाल्याचे समाधान दिसत होते.