शिवसेनेचा नरेंद्र मोदी यांना अपशकून !; दहा दिवसात भुमिकेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 03:38 PM2017-11-09T15:38:24+5:302017-11-09T15:38:35+5:30
नाशिक : गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपशकून नको म्हणून शिवसेना या निवडणुकीपासून दूर राहणार असल्याचे सांगणा-या शिवसेनेच्या भुमिकेत दहा दिवसातच बदल झाला असून, शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गुजरात निवडणुकीत ४० जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय जाहीर केल्याने शिवसेना आता नरेंद्र मोदी यांना अपशकून करण्यास सरसावल्याचे मानले जात आहे.
नाशिकच्या दौºयावर आलेले संपर्क नेते तथा शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधतांना गुजरात निवडणुकीपासून शिवसेना दूर राहणार असल्याचे सांगितले होते. गुजरातची निवडणूक चांगलीच गाजत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होमपिच असलेल्या गुजरातची राजकीय परिस्थिती पाहता मोदी यांना अपशकून नको म्हणून शिवसेना निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले होते. हे सांगत असताना राऊत यांनी कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांची स्तुतीही केली होती. गुजरातच्या निवडणुकीबाबत शिवसेनेने घेतलेल्या या भुमिकेचे भाजपाने स्वागत केले तर विरोधी पक्षांनी आश्चर्य व्यक्त केले होते. शिवसेनेने सातत्याने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भुमिका घेत त्यांच्यावर टिका केलेली असताना अचानक गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना मोदी यांचा पुळका आल्याबद्दल शिवसेनेवर टिकाही करण्यात आली होती. परंतु दहा दिवस उलटत नाही तोच शिवसेनेने गुजरात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय जाहीर केल्याने शिवसेनेच्या मनात नरेंद्र मोदी यांच्याविषयी असलेला मान अचानक कमी झाला काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. सेनेची गुजरात निवडणुकीत उडी म्हणजे हिंदु मतांचे विभाजन मानले जात असून, त्यामुळे मोदी यांना अपशकून करण्यासाठीच सेना निवडणूक लढविणार असल्याचे मानले जात आहे. सेनेच्या या भुमीकेने भाजपात चिंता व्यक्त होणे साहजिकच असून, विरोधी पक्षांनी मात्र सेनेच्या या भुमिकेचे स्वागत केले आहे.