शिवसेनेचा ठाकरे गट नाशकात म्हणणार, "दार उघड बये दार उघड!", पुढील महिन्यात अधिवेशन
By संजय पाठक | Published: November 24, 2023 11:29 AM2023-11-24T11:29:42+5:302023-11-24T11:30:09+5:30
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये या संदर्भात पाहणी करून पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
नाशिक- देशात आणि राज्यात काँग्रेसचा बोलबाला असताना विरोधी पक्ष म्हणून संघर्ष करणाऱ्या शिवसेनेने 1994 मध्ये नाशिक मध्ये महा अधिवेशन घेतले आणि दार उघड दार उघड असे व्यासपीठ करून देवी मातेला साकडे घातले आता असेच साकडे घालण्यासाठी नाशिक मध्ये पुढील महिन्यामध्ये महा अधिवेशन घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये या संदर्भात पाहणी करून पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. येत्या 23 डिसेंबर 2023 किंवा नव्या वर्षात 23 जानेवारी 2024 रोजी हे महाअधिवेशन नाशिक घेण्याची प्राथमिक चर्चा करण्यात आली या अधिवेशनाला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत.
एकेकाळी काँग्रेसचा देशातआणि राज्यात बोलबाला असताना शिवसेनेने प्रखरपणे विरोधी पक्षाची भूमिका बजावली त्यानंतर नाशिकमध्ये 1994 मध्ये शिवसेनेचे महा अधिवेशन घेण्यात आले हे अधिवेशन अनेक अर्थाने गाजले होते शिवसेनाप्रमुखांची सभा ऐकण्यासाठी नाशिकच्या गोल क्लब मैदानात बाहेरही लाखो लोकांची गर्दी झाली होती.
हीच सत्ता परिवर्तनाची नांदी मानली गेली होती त्यामुळे आता राज्यातील एकंदर सगळी राजकीय परिस्थिती बघता अस्तित्वाची लढाई करणाऱ्या शिवसेनेनेपुन्हा नाशिक या लकी ठरलेल्या ठिकाणीच महा अधिवेशन घेण्याचे ठरवलं आहे. हे अधिवेशन पुढील महिन्यात किंवा नवीन वर्षात घ्यायचे याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.