कॉँग्रेसपुढे शिवसेनेचे कडवे आव्हान
By admin | Published: February 16, 2017 12:32 AM2017-02-16T00:32:55+5:302017-02-16T00:36:04+5:30
अग्निपरीक्षा : गट ताब्यात घेण्यासाठी कसरत
घोटी : शिवसेनेला कायम हुलकावणी देणाऱ्या नांदगाव सदो गटाला ताब्यात घेण्यासाठी शिवसेना पुन्हा सज्ज झाली असून, कॉँग्रेसपुढे शिवसेनेचे कडवे आव्हान राहणार आहे. अनुसूचित जमातीकरिता आरक्षित असलेल्या या गटात शिवसेनेच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत.
काही काळापूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा हा गट दशकांपूर्वी काँग्रेस पक्षाने आपल्या ताब्यात घेतला होता. दरम्यान, दोन्ही निवडणुकांत काँग्रेस आणि शिवसेनेत अटी-तटीच्या लढती होत काँग्रेसने बाजी मारली होती. या गटातून प्रारंभी जनार्दन माळी आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी बेबी माळी या निवडून आल्या होत्या.
या निवडणुकीतही मर्यादित उमेदवार ठेवण्याची परंपरा गटाने कायम राखली आहे. शिवसेना, भाजपा, काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी परस्पर विरोधी आव्हान उभे केले आहे. असे असले तरी खरी लढत ही कॉँग्रेस आणि शिवसेनेतच रंगणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पूर्वी तालुक्यातील इतर पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शिवसेनेत दाखल झाल्याने तसेच हा गट पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने हा गड पुन्हा राखू असा विश्वास शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे, तर काँग्रेसच्या ताब्यात असलेला गट पुन्हा काँग्रेसच ताब्यात घेईल, असा विश्वास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र एकेकाळी भाजपाला ही झुकते माप देणाऱ्या या गटात पुन्हा एकदा भाजपा बाजी मारेल असा विश्वास भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
नांदगाव सदो व काळुस्ते या दोन गणांचा समावेश असणाऱ्या या गटातील मतदार मोठ्या प्रमाणात दुर्गम भागात राहतात. याच गटातील काळुस्ते गणातील काँग्रेसच्या ठकूबाई सावंत यांना सभापती होण्याचा मान मिळाला होता. मात्र उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. दरम्यान, या गटात बंडखोरी व मतविभाजन यामुळे शिवसेना आणि काँग्रेस यात काट्याची लढत होणार असून, काँग्रेससाठी गटातील निवडणूक म्हणजे अग्निपरीक्षा ठरणार आहे.