खासगी रुग्णालयांवर कारवाईसाठी शिवसेनेचा अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:16 AM2021-05-27T04:16:09+5:302021-05-27T04:16:09+5:30
नाशिक : शहरातील काही खासगी रुग्णालयांकडून काेरोनाबाधितांवर उपचार करताना भरमसाठ बिले मागितली जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले ...
नाशिक : शहरातील काही खासगी रुग्णालयांकडून काेरोनाबाधितांवर उपचार करताना भरमसाठ बिले मागितली जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. महापालिकेने खासगी रुग्णालयात नियुक्त केलेले लेखापरीक्षक आणि नोडल ऑफिसर हतबल झाले आहेत. त्यामुळे रुग्णांची पिळवणूक करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी, असा अल्टिमेटम शिवसेनेने प्रशासनाला दिला आहे. अन्यथा आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही या पक्षाने दिला आहे.
विराेधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी बुधवारी (दि.२६) प्रशासनाला पत्र दिले. त्यात महापालिकेचे लेखापरीक्षक खासगी रुग्णालयांवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही केला आहे गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर शहरात अनेक रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचारासाठी परवानगी देण्यात आल्या आहेत. यापूर्वीही या रुग्णालयांवर अंकुश ठेवण्यासाठी खासगी रुग्णालयांच्या लेखापरीक्षणाची मागणी केली होती. महापालिकेने त्यानुसार कार्यवाही केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात पुन्हा भरमसाठ बिलांच्या वसुलीचे प्रकार सुरू झाले आहेत. यासंदर्भात नागरिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडे धाव घेत आहेत.
दुसऱ्या लाटेत एकेका घरात चार ते सहा रुग्ण बाधित झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या उपचारासाठी मिळकती मोडून बिल भरण्याची वेळ आली आहे. अनेकांनी व्याजानेदेखील पैसे घेतले आहेत. मात्र अशा रुग्णांकडून भरमसाठ रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयाकडील देयकांची मनपाचे लेखापरीक्षक, नोडल ऑफिसर यांच्यामार्फत तात्काळ तपासणी करून रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही बोरस्ते आणि शिंदे यांनी केली आहे.