एका महिन्यात चार लाख जणांचे ‘शिवभोजन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 01:29 AM2021-10-06T01:29:59+5:302021-10-06T01:31:12+5:30
कोरोनाच्या संकटकाळात अनेकांना आधार ठरलेली शिवभोजन थाळी कोरोनानंतरही नागरिकांची क्षुधाशांती करीत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाही मागील महिन्यात तब्बल ४ लाख २६ हजार जणांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. एका महिन्यातील हा विक्रम मानला जात आहे.
नाशिक : कोरोनाच्या संकटकाळात अनेकांना आधार ठरलेली शिवभोजन थाळी कोरोनानंतरही नागरिकांची क्षुधाशांती करीत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाही मागील महिन्यात तब्बल ४ लाख २६ हजार जणांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. एका महिन्यातील हा विक्रम मानला जात आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रभावात म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यातील शिवभोजन थाळीचा प्रतिसाद पाहिला तर दीड ते दोन लाखांच्या जवळपास नागरिकांनी थाळीचा लाभ घेतला असल्याचे दिसून येते. त्यानंतर हळूहळू अनलॉक होऊ लागले तसतशा सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध झाल्या. खाद्यपदार्थ्यांची दुकाने, हॉटेल्स सुरू झाली असली तरी शिवभोजन थाळीचा प्रतिसाद कमी झाला नाही. गेल्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीतच लाखांच्या पुढेच थाळीला प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले. त्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांतील संख्या तर चार लाखांच्या पुढे असून एकूण गेल्या सहा महिन्यांत नाशिक जिल्ह्यात १८ लाख नागरिकांची शिवभोजन थाळीने भूक भागवली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ही योजना असून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्यात सर्वत्र शिवभोजन थाळी उपक्रम राबविला जात आहे. सर्वसामान्यांना अल्प दरात पोटभर जेवण मिळावे म्हणून मार्च २०२० मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. कोरोनाकाळात ही योजना सर्वसामान्यांसाठी मोठा आधार ठरली. या काळात सर्वकाही ठप्प असताना गोरगरीब, हातावर पोट असणाऱ्यांना शिवभोजन थाळीचा आधार मिळाला. गोरगरिबांचे पोट यामुळे भरत असून प्रतिसाद वाढतच असल्याचे दिसत आहे.
पहिल्या लाटेनंतर कोरेाना नियंत्रणात येत असतानाच एप्रिल महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली व पुन्हा एकदा लाॅकडाऊन करावा लागला. या कालावधीत गोरगरिबांची उपासमार होऊ नये यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी सर्वांसाठी मोफत केली. नाशिक जिल्ह्यात जवळपास ५२ केंद्रांच्या माध्यमातून गरजूंना मोफत शिवभोजन थाळीचा लाभ मिळत आहे.
--इन्फो--
महिना लाभार्थी
एप्रिल १३१२७२
मे २९८७७४
जून २७३५६३
जुलै २६८९८९
ऑगस्ट ४०२६०९
सप्टेंबर ४२६३७५