त्र्यंबकराजाच्या प्रवेशद्वारावरच शिवभक्तांनी घातले लोटांगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:18 AM2021-08-24T04:18:34+5:302021-08-24T04:18:34+5:30

त्र्यंबकेश्वर : श्रावणातील तिसऱ्या व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या समजला जाणाऱ्या सोमवारी (दि. २३) त्र्यंबकेश्वर येथे शिवभक्तांनी त्र्यंबकराजाच्या प्रवेशद्वारावरच ...

Shiva devotees put lotangana at the entrance of Trimbakaraja | त्र्यंबकराजाच्या प्रवेशद्वारावरच शिवभक्तांनी घातले लोटांगण

त्र्यंबकराजाच्या प्रवेशद्वारावरच शिवभक्तांनी घातले लोटांगण

Next

त्र्यंबकेश्वर : श्रावणातील तिसऱ्या व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या समजला जाणाऱ्या सोमवारी (दि. २३) त्र्यंबकेश्वर येथे शिवभक्तांनी त्र्यंबकराजाच्या प्रवेशद्वारावरच लोटांगण घालत भोलेनाथाची आराधना केली. यावेळी हर हर महादेवच्या जयघोषात मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने त्र्यंबकराजाची पालखी काढण्यात आली.

श्रावणमासातही मंदिर खुले न झाल्याने निराश भाविकांनी त्र्यंबकराजाच्या प्रवेशद्वारावरच डोके टेकविले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ब्रह्मगिरीची प्रदक्षिणाही बंद ठेवली आहे. त्र्यंबकेश्वरला श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी लाखो भाविक जमा होत असतात. परंतु, यंदा कोरोनामुळे संचारबंदी लागू केल्याने भाविकांची वर्दळ कमी दिसून आली. सोमवारी उत्तररात्री पेगलवाडी फाटा येथे फक्त पोलिसांचीच गर्दी दिसून आली. याठिकाणी भाविक-पोलिसांत वादविवादाचेही दर्शन घडून आले. दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या नित्य नैमित्तिक तिन्ही त्रिकाल पूजा परंपरेनुसार झाल्यानंतर दुपारी तीन वाजता मंदिराचे दरवाजे उघडून मंदिराच्या प्रांगणातून फेरी मारून त्र्यंबकराजाची पालखी मंदिराबाहेर काढण्यात आली. शाही लवाजम्यात पालखी सजवली होती. पेशवाई पोशाखात पालखीचे भालदार, चोपदार पुढे चालत होते. या पालखी मिरवणुकीत मुख्य प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य, सुरक्षा अधिकारी अमित टोकेकर, संस्थानचे जनसंपर्क अधिकारी रवी जाधव, आदी अधिकारी यांच्यासह विश्वस्त चेअरमन विकास कुलकर्णी, पालिकेचे मुख्याधिकारी तथा देवस्थानचे सचिव संजय जाधव, दिलीप तुंगार, सत्यप्रिय शुक्ल, प्रशांत गायधनी, पंकज भुतडा, संतोष कदम, तृप्ती धारणे, भुषण अडसरे हे सहभागी झाले होते. कुशावर्तावर देवाची पूजा, स्नान, आरती, पुष्पांजली झाली. यावेळी चिन्मय फडके, गिरीष तथा अतुल जोशी यांनी पूजाविधी पार पाडला. पुनश्च पालखी परतीच्या मार्गाने पारंपरिक वाद्यवृंदाच्या जयघोषात मंदिरात परतली.

इन्फो

ब्रह्मगिरीची फेरी बंदच

दरवर्षी तिसऱ्या श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरीच्या फेरीला लाखोने गर्दी असते. गतवर्षीप्रमाणे यंदाही कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मगिरीच्या फेरीला मनाई करण्यात आली होती. तरीही काही भाविकांनी खुष्कीच्या मार्गाने जात फेरीचा आनंद लुटलाच. मंदिर बंद ठेवण्यात आले असले तरी गावातील अन्य सर्व व्यवहार सुरळीत होते. यंदा पाच श्रावणी सोमवार आहेत. ६ सप्टेंबर रोजी सोमवती अमावास्या आहे. या दिवशीही गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Shiva devotees put lotangana at the entrance of Trimbakaraja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.