‘छावा’ची जानेवारी महिन्यात मागासवर्ग आयोगासोबत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 05:41 PM2019-01-01T17:41:04+5:302019-01-01T17:41:18+5:30
सिन्नर : मराठा समाजाचे विविध मागण्यांसाठी दिल्लीत जंतरमंतर मैदानावर छावा मराठा संघटनेने तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले होते.
सिन्नर : मराठा समाजाचे विविध मागण्यांसाठी दिल्लीत जंतरमंतर मैदानावर छावा मराठा संघटनेने तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात ८ जानेवारीला राष्टÑीय मागासवर्ग आयोगाचे अधिकाऱ्यांसोबत दिल्ली येथे सकारात्मक चर्चा करण्यात येणार असल्याचे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी (दि.२८) रोजी झालेल्या चर्चेत दिले. आठवले यांनी विनंती केल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांनी सांगितले.
मराठा समाजाचा केंद्रीय ओ. बी. सी. यादीत समावेश करावा, तत्कालीन खासदार सुदर्शन नचिपन समितीच्या शिफारशींचा अहवाल स्विकार करावा तसेच ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवावी आदी मागण्यांबाबत केंद्र सरकारच्या वतीने सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. छावा मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, मराठा आरक्षणाचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील आदींनी आपली बाजू प्रखरपणे मांडली.