शिवजयंतीची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:25 AM2018-02-17T00:25:41+5:302018-02-17T00:25:59+5:30
परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, रस्ते भगवेमय होत आहेत. ओझर, सुकेणे, पिंपळगाव बसवंत येथील बाजारपेठांमध्ये शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा, मूर्ती, भगवे झेंडे दाखल झाल्याने शिवप्रेमींची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.
कसबे सुकेणे : परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, रस्ते भगवेमय होत आहेत. ओझर, सुकेणे, पिंपळगाव बसवंत येथील बाजारपेठांमध्ये शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा, मूर्ती, भगवे झेंडे दाखल झाल्याने शिवप्रेमींची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. सोमवारी (दि.१९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने सुकेणे परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कसबे सुकेणे येथील विविध सामाजिक मंडळे, संस्था, केआरटी विद्यालय, शाळा यांच्या वतीने जयंती सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. येथील दत्ता पाटील यांच्या संकल्पनेतून कसबे सुकेणे येथे दरवर्षी शिवजयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबविला जातो. यंदा ‘धुळीपासून सुकेणेकरांचे संरक्षण आणि उपाय-योजना’ या विषयी कार्यक्रम होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. ओणे, थेरगाव, दात्याणे, जिव्हाळे, दीक्षी, कोकणगाव, पिंपळस (रामाचे), भाऊसाहेबनगर, शिरसगाव या भागातही शिव जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. प्रत्येक रस्ते, चौक पताका, झेंड्यांनी सजू लागले आहेत.
ओझर, कसबे सुकेणे, पिंपळगाव येथील बाजारपेठा शिवमय
ओझर, कसबे सुकेणे, पिंपळगाव येथील बाजारपेठा आणि मुंबई-आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी शिवाजी महाराज यांच्या मूर्ती, भगवे झेंडे, प्रतिमा विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने तालुक्यातील शिवप्रेमींनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. आडगाव, ओझर परिसरात राजस्थानमधील कारागीर दाखल झाले असून, शिवाजी महाराज यांच्या विविध मुद्रेतील आकर्षक पुतळे त्यांनी बनवले आहेत. उंचीनुसार सरासरी दोनशे ते पाच हजार रुपयांपर्यंतचे पुतळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे कारागीर दोन महिन्यांपासून रात्रंदिवस मूर्ती तयार करत आहेत, अशी माहिती राजस्थानहून आलेले मोतीलाल मूर्तीवाले यांनी दिली.