लाचखोर शिवाजी चुंभळे यांना न्यायालयीन कोठडी; जामिनावर सोमवारी निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 08:51 PM2019-08-17T20:51:11+5:302019-08-17T20:55:30+5:30
दोन्ही बाजूंकडून झालेल्या जोरदार युक्तीवादामुळे अडीच तास सुनावणी चालली. सायंकाळी सहा वाजून २५ मिनिटाला न्यायालयाने चुंभळे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच जामीन अर्जावर सोमवारी पुन्हा सुनावणी होणार असल्याचे सांगितले.
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेनेचे नेते माजी नगरसेवक शिवाजी चुंभळे यांना ३ लाख रूपयांची लाचेच्ी रक्कम तक्रारदाराकडून स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी (दि.१७) पथकाने संशयित चुंभळे यांना हजर केले. जिल्हा सत्र न्यायाधीश वर्ग-१ व्ही.एस.कुलकर्णी यांच्या न्यायालयात पोलीस कोठडी व जामीन मिळविण्यासाठी सुमारे अडीच तास दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तीवाद चालला. न्यायालयाने युक्तीवाद ऐकून घेत चुंभळे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली तसेच जामीन अर्जावरील सुनावणी येत्या सोमवारी (दि.१९) होणार असल्याचे सांगितले. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस कोठडीसाठी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
बाजार समितीच्या एका विद्यमान संचालकाच्या भाच्यास ई-नाम योजनेअंतर्गत समितीमध्ये सहा महिन्यांसाठी कंत्राटी पध्दतीने नोकरीचे नियुक्तीपत्र देण्याकरिता चुंभळे यांनी सुमारे १० लाखांची लाच मागितल्याची बाब तपासात पुढे आली. तडजोडअंती सहा लाख रूपयांची रक्कम ठरविली गेली. त्या लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता तीन लाख रूपये स्विकारताना चुंभळे यांना बागायतदारांच्या वेशात सापळा रचलेल्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
शनिवारी दुपारी चार वाजता न्यायालयात सुनावणीला सुरूवात झाली. सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तीवाद करत संशयित आरोपीच्या आवाजाचे नमुने, विविध बॅँकांमध्ये एकापेक्षा अधिक असलेली बॅँक खाती, लॉकर्सची पडताळणी तसेच फार्महाऊसवर तपासी पथकाला आढळून आलेले किमान ७०पेक्षा अधिक वेगवेगळ्या जमिनींची सातबारासारखी कागदपत्रे, ८ ते १० खरेदीखत यांची पडताळणीकरिता पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. संशयिताच्या वकिलांनी बचाव करत गुन्ह्यातील रक्कम जप्त करण्यात आली असून त्यांच्या पक्षकाराच्या व्याधी, वय सांगून पोलीस कोठडीची गरज नसल्याने सरकारी पक्षाची मागणी रद्द करण्याचा युक्तीवाद चुंभळे यांच्याकडून अॅड. अविनाश भिडे यांनी केला. तसेच जामीन मिळविण्यासाठी अर्ज न्यायालयात सादर केला. यावेळी मिसर यांनी त्यावर हरकत घेत जामीन अर्ज अगोदर नोंदविण्याची मागणी न्यायालयाकडे केली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत जामीन अर्ज नोंदणी होऊन न्यायालयापुढे मांडला गेला. दोन्ही बाजूंकडून झालेल्या जोरदार युक्तीवादामुळे अडीच तास सुनावणी चालली. सायंकाळी सहा वाजून २५ मिनिटाला न्यायालयाने चुंभळे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच जामीन अर्जावर सोमवारी पुन्हा सुनावणी होणार असल्याचे सांगितले.