सभापतिपदी शिवाजी गांगुर्डे
By Admin | Published: April 8, 2017 01:09 AM2017-04-08T01:09:14+5:302017-04-08T01:09:26+5:30
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे भाजपाचे शिवाजी गांगुर्डे यांची निवड झाली आहे.
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे भाजपाचे शिवाजी गांगुर्डे यांची निवड झाली आहे. गांगुर्डे यांनी शिवसेनेचे उमेदवार दत्तात्रेय सूर्यवंशी यांचा दोन मतांनी पराभव केला. गांगुर्डे यांना नऊ, तर सूर्यवंशी यांना सात मते मिळाली.
महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी अपर आयुक्त जोतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. सभापतिपदासाठी भाजपाकडून शिवाजी गांगुर्डे यांनी, तर शिवसेनेकडून दत्तात्रेय सूर्यवंशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीनंतर माघारीसाठी पंधरा मिनिटांचा अवधी देण्यात आला. परंतु, माघारी अर्ज न आल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले. यावेळी शिवाजी गांगुर्डे यांच्या बाजूने भाजपाचे शशिकांत जाधव, जगदीश पाटील, मुकेश शहाणे, अलका अहिरे, विशाल संगमनेरे, सीमा ताजणे, सुनीता पिंगळे व श्याम बडोदे यांनी मतदान केले, तर शिवसेनेचे दत्तात्रेय सूर्यवंशी यांच्या बाजूने सेनेचे सूर्यकांत लवटे, भागवत आरोटे, प्रवीण तिदमे, राष्ट्रवादीचे राजेंद्र महाले, कॉँग्रेसच्या वत्सला खैरे आणि मनसे आघाडीचे मुशीर सय्यद यांनी मतदान केले. शिवाजी गांगुर्डे नऊ विरुद्ध सात मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केले.
सभापतिपदी निवड झाल्यानंतर महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते गांगुर्डे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, भाजपाचे गटनेता संभाजी मोरुस्कर, माजी शहराध्यक्ष विजय साने आदि उपस्थित होते. याशिवाय, कॉँग्रेसचे गटनेता शाहू खैरे, राष्ट्रवादीचे गटनेता गजानन शेलार व मनसेचे गटनेता सलीम शेख यांनीही गांगुर्डे यांचा सत्कार केला. (प्रतिनिधी)